Vikrant Massey Recalls Being Shouted At By Director : विक्रांत मेस्सी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला त्याच्या ‘१२ फेल’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. अभिनयाचा कोणताही वारसा नसताना विक्रांतने त्याच्या हिमतीवर हा प्रवास केला आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का त्याच्यासाठी इथपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. त्याने नुकतंच त्याच्या संघर्षकाळाबद्दल सांगितलं आहे.
विक्रांत मेस्सी अभिनयात येण्यापूर्वी एका रेस्टॉरेंटमध्ये काम करायचा आणि तो त्याच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलत होता. पण, त्यावेळी एका निर्मात्याने त्याला तिथे पाहिलं आणि मालिकेची ऑफर दिली, ज्यानंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. पण, करिअरच्या सुरुवातीला त्यालाही काही इतर कलाकारांसारखे वाईट अनुभव आले. याबद्दल त्याने ‘रिपब्लिक वर्लड’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
विक्रांत मॅसीने सांगितला संघर्षकाळ
विक्रांत मेस्सी म्हणाला, “मला कायम अभिनेता व्हायचं होतं, पण १६ वर्षांचा असताना कोणालाच कलाकार व्हायचं आहे असं वाटत नाही. मला वाटलेलं की माझं शिक्षण पूर्ण करेन आणि मग एनएसडी किंवा एफटीआयला जाईन. जेव्हा मी २४-२५ वर्षांचा होईन तेव्हा अभिनय क्षेत्रत काम करेन. मला आठवतंय, मी मुंबईतील रेस्टॉरेंटमध्ये बरिसता म्हणून काम करायचो, मला माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं म्हणून.”
विक्रांतने पुढे सांगितले की, त्याने पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर काम केलं तेव्हा तो खूप नवीन होता, त्याला अभिनयाचं कोणतंही योग्य प्रशिक्षण मिळालं नव्हतं. अभिनेता म्हणाला, “मढ आयलंडमध्ये शूटिंग सुरू होतं. आताही मी मढमध्येच राहतो, त्या सेटपासून ५ मिनिटांच्या अंतरावर. मी १६ वर्षांचा होतो आणि पहिल्यांदाच कॅमेरासमोर काम करत होतो. अभिनयाच्या बाबतीत मी फार वाईट होतो आणि तेव्हा लोक शोच्या सुरुवातील चित्रपटांच्या दिग्दर्शकाला बोलावायचे शो सेट करण्यासाठी त्यांच्याकडे सुरुवातीला चांगले पैसे असायचे. पण, मी खूप वाईट काम करत होतो मला आठवतंय.”
विक्रांत मॅसीने सांगितला ‘तो’ अनुभव
दिग्दर्शकाबद्दल विक्रांत पुढे म्हणाला, “दिग्दर्शक मला ओरडला तेव्हा मी रडायलाच लागलो, मी खूप नाजूक होतो त्यावेळी. माझ्या लाईन्स पाठ करत होतो आणि दिग्दर्शकाला मी ज्याप्रकारे काम करत होतो ते आवडत नव्हतं. त्याचा संयम सुटला आणि तो माईकवर जोरात माझ्यावर ओरडला. तो खासगी गोष्टींबद्दलही बोलला. मला आठवतंय मी खचलो होतो आणि रडत होतो, कारण मला खूप वाईट वाटलेलं.”
विक्रांतने पुढे ज्या निर्मातीने त्याची निवड केलेली, ती त्याला येऊन समजावत होती असं सांगितलं; तेव्हा तो तिला १०० लोकांसमोर नव्हतं ओरडायला पाहिजे असं म्हणालेला. पुढे त्याने दिग्दर्शकानेही त्याची माफी मागितल्याचं म्हटलं आहे. तो म्हणाला, “तो इतका चांगला होती की संध्याकाळी माझ्याकडे येऊन मला सॉरी म्हणाला; मी तुझ्याशी असं नव्हतं बोलायला पाहिजे असं म्हणालेला.”
