Vikrant Massey Talk About Son Religion : ’12th फेल’, ‘सेक्टर 36’ आणि ‘द साबरमती रिपोर्ट’सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारा अभिनेता म्हणजे विक्रांत मॅसी. अभिनेता अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. अभिनेत्याने १८ फेब्रुवारी २०२२ रोजी शीतल ठाकूरशी लग्न केले. त्यानंतर गेल्या वर्षी त्यांनी ‘वरदान’ नावाच्या मुलाला जन्म दिला. काही दिवसांपुर्वी विक्रांतने त्याच्या आई-वडील आणि भावाच्या धर्माबाबत सांगितलं होतं.
विक्रांतचे वडील ख्रिश्चन असून आई शीख धर्मीय आहे. त्याच्या मोठ्या भावाने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तर विक्रांत मॅसीची पत्नी शीतल ठाकूर हिंदू आहे. त्यानंतर आता विक्रांतने त्याच्या मुलाच्या धर्माबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्याने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं की, त्याने त्याच्या मुलाच्या धर्माबाबत एक निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने त्याच्या मुलाच्या जन्म प्रमाणपत्रात धर्माचा उल्लेख केलेला नाही. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये विक्रांतने याबद्दल सांगितलं आहे
यावेळी विक्रांत म्हणाला, “मला वाटतं की, धर्माबद्दलचा प्रत्येक निर्णय हा वैयक्तिक असतो. मला वाटतं की, सगळ्यांना त्यांच्या पद्धतीने आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य असावं. प्रत्येकाला त्याचा धर्म निवडण्याचा अधिकार आहे. माझे वडील ख्रिश्चन आहेत, माझी आई शीख आहे. मी प्रत्येक धर्माचं पालन करतो. मला वाटतं धर्म मानवनिर्मित आहे.”
विक्रांत मॅसी इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे विक्रांत म्हणाला, “मी पूजा करतो, मी गुरुद्वारातही जातो आणि मी दर्ग्यातही जातो. या सगळ्यामुळे माझ्या मनाला शांतता मिळते. या सगळ्याबद्दल माझी एक श्रद्धा आहे की, कोणी तरी आहे. कोणीतरी आहे, जो या सर्वावर नियंत्रण ठेवत आहे. मला वाटतं या श्रद्धेमुळेच मी इथपर्यंत आलो आहे आणि याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो.”
यानंतर विक्रांत मुलाच्या धर्माबद्दल असं म्हणाला, “आम्ही आमच्या मुलाच्या जन्म प्रमाणपत्रावरील धर्म लिहिण्याचा कॉलम रिकामी ठेवला होता. जन्म प्रमाणपत्रावरील धर्माच्या कॉलममध्ये मी फक्त एक रेष ओढली होती. म्हणून जेव्हा त्याचं जन्म प्रमाणपत्र आलं तेव्हा त्यावर धर्म लिहिलेला नव्हता. मला वाटतं सरकार तुम्हाला धर्म लिहायला सांगत नाही. ते पूर्णत: तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला नको असेल तर ते त्यावर येणार नाही.”
यानंतर त्याने सांगितलं, “माझ्या आई-वडिलांना कळलं की, मी धर्मावरुन भेदभाव करत आहे तर त्यांना वाईट वाटेल. तसंच माझा मुलगाही धर्मावरुन भेदभाव करत आहे असं कळलं तर मलाही खूप वाईट वाटेल. असं होऊ नये म्हणून मी माझ्या मुलावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करत आहे.” दरम्यान, विक्रांतच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘आँखों की गुस्ताखियां’ या चित्रपटात दिसणार आहे.