कलाकार जितके त्यांच्या भूमिका, तसेच विविध कलाकृतींमुळे चर्चेत असतात, तितकेच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. त्यांची रिलेशनशिप, लग्न, मुले, शिक्षण, संपत्ती, इतर कलाकारांबरोबरचे नातेसंबंध, वाद विवाद, मैत्री, घटस्फोट अशा अनेक कारणांमुळे या कलाकारांची चर्चा होताना दिसते.

अभिनेते विंदू दारा सिंह यांना त्यांच्या हनुमान या भूमिकेमुळे मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. जय वीर हनुमान या टीव्ही शोमध्ये त्यांनी हनुमान ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका लोकप्रिय ठरली. दिग्गज पैलवान व अभिनेते दारा सिंह विंदू यांचे वडील आहेत.

अभिनेत्याचे ६ वर्षांत मोडलेले पहिले लग्न

भूमिकांबरोबरच विंदू दारा सिंह त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील अनेकदा चर्चेत येतात. त्यांनी दोन लग्ने केली. पहिले लग्न त्यांनी १९९६ मध्ये केले होते. तब्बूची बहीण व अभिनेत्री फराह नाझ यांच्याशी त्यांचे पहिले लग्न झाले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. त्यांची सतत भांडणे होऊ लागली. त्यामुळे लग्नानंतर सहा वर्षांनी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेऊन, घटस्फोट घेतला. त्यांना एक मुलगा आहे.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, फराह नाझ आणि विंदू दारा सिंग यांची पहिली भेट १९९० च्या दशकात एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. पहिल्याच भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ते सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. १९९६ ला विंदू व फराह यांनी लग्नगाठ बांधली. १९९७ ला त्यांना मुलगा झाला. मात्र, २००२ मध्ये ते वेगळे झाले.

फराह नाझ यांच्याबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर विंदू पुन्हा एकदा प्रेमात पडले. रशियन मॉडल डीना उमारोवाच्या ते प्रेमात पडले. २००६ मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना एक मुलगी झाली. हे दोघे ‘नच बलिये’च्या सहाव्या पर्वात स्पर्धक म्हणूनही सहभागी झाले होते. प्रेक्षकांना त्यांची जोडी आवडली होती.

डीन उमरोवा लग्नाआधी मॉडेलिंग क्षेत्रात काम करत होती. मात्र, विंदू दारा सिंह यांच्याशी लग्न केल्यानंतर तिने मॉडेलिंग करणे सोडले. आता ती बेसो एंटरप्राईज कंपनीची सीईओ आहे. त्याबरोबरच ती जेल नेल पॉलिश ब्रँडची मालकीणदेखील आहे. याबरोबरच ती ब्यूटी ट्रेनिंग अकॅडमीदेखील चालवते.

विंदू दारा सिंह यांनी अनेक बॉलीवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. याबरोबच ते बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्येदेखील सहभागी झाले होते. दरम्यान, आगामी काळात ते कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.