Nidhi Dutta on Akshaye Khanna: विनोद खन्ना यांनी १९६८ ला प्रदर्शित झालेल्या ‘मन का मीत’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी सहाय्यक भूमिका साकारली होती. १९७१ ला प्रदर्शित झालेल्या ‘हम तुम और वह’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा प्रमुख भूमिका साकारली होती.

१९७१ ला प्रदर्शित झालेल्या ‘मेरा गाँव मेरा देश’, तसेच ‘मेरे अपने या चित्रपटांनी त्यांना ओळख मिळवून दिली. विनोद खन्ना यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांत काम केले. त्यामुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. विनोद खन्ना त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्याचीदेखील चर्चा होत असे.

आता त्यांचा मुलगा अक्षय खन्नादेखील काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. ‘धुरंधर’मधील त्याची रेहमान डकैत ही भूमिका चांगलीच गाजली. त्याबरोबरच, ‘बॉर्डर २’मध्ये त्याने कॅमिओ केला. ‘बॉर्डर २’ हा ‘बॉर्डर’ चित्रपटाचाच सीक्वेल आहे. जेपी दत्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. जेपी दत्ता यांची मुलगी निधी दत्ताने ‘बॉर्डर २’ची निर्मिती केली आहे.

आता ‘शोशा'(SHOWSHA)ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने खुलासा केला की, तिचे वडील जेपी दत्ता यांनी जोपर्यंत अक्षयला ‘बॉर्डर’मध्ये काम करण्यासाठी विचारले नव्हते, तोपर्यंत अक्षयने अभिनय क्षेत्रात काम करायचे आहे, याबद्दल तो त्याच्या वडिलांशीदेखील बोलला नव्हता.

“अक्षय परदेशात…”

अक्षय खन्नाबद्दल निधी दत्ता म्हणाली, “अक्षय परदेशात शिक्षणासाठी जाणार होता.” पुढे अक्षय अभिनय क्षेत्रात कसा आला, याचा किस्सा सांगताना निधी म्हणाली, “मला जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे अक्षय त्याचे वडील विनोद खन्ना आणि माझे वडील जेपी दत्ता यांच्याबरोबर जेवण करत होता. माझ्या वडिलांनी त्याला विचारले की, तू बॉर्डर या चित्रपटात काम करशील का?

अक्षय दोन दिवसांत भारतातून जाणार होता. पण, ज्यावेळी माझ्या वडिलांनी त्याला अभिनय करण्याविषयी विचारले, त्यावेळी तो हो म्हणाला. त्यावर विनोद खन्ना त्याला म्हणाले की, तू वेडा आहेस का? तुला अभिनेता व्हायचे आहे, हे तू मला कधीच सांगितले नाहीस. त्यावर अक्षय त्यांना म्हणालेला की, मी तुम्हाला आता सांगत आहे की, मी अभिनेता होईन.

निधी दत्ताने पुढे सांगितले की, बॉर्डर या चित्रपटात अनेक कलाकार असणार होते. त्यामुळे अक्षयला हिमालय पुत्र या चित्रपटातून लाँच करण्याचे विनोद खन्ना यांनी ठरवले. १९९७ ला तो चित्रपट प्रदर्शित झाला होता. साहजिकच, बॉर्डर हा त्याचा दुसरा चित्रपट ठरला. निधी असेही म्हणाली, “त्याला त्या युनिफॉर्ममध्ये पाहणे हे त्याच्यासह आमच्यासाठीसुद्धा खूप खास होते. “

“माझ्या वडिलांना सांगण्यास भीती…”

अभिनय क्षेत्रात त्याची कशी सुरुवात झाली, याबद्दल अक्षयनेदेखील वक्तव्य केले होते. प्रभू चावलाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणालेला, “माझ्या वडिलांच्या घरी जेपी दत्तासाहेब जेवणासाठी आले होते. तेव्हा मी बोर्डिंग स्कूलमध्ये होतो. १८ वर्षांचा असेन. तेव्हा त्यांनी मला विचारले की, एक बॉर्डर नावाचा सिनेमा बनवत आहे. तू त्यामध्ये काम करशील का? मला माझ्या वडिलांना सांगण्यास भीती वाटत होती की, मला चित्रपटात काम करायचे आहे.

जेव्हा जेपीसाहेबांनी मला विचारले, तेव्हा मला वाटले की, हीच योग्य वेळ आहे. त्यावेळी मी त्यांना होकार देत विचारले की, चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होणार आहे? त्यावर त्यांनी मला विचारले होते की, एक वर्षात सुरू होणार आहे. तोपर्यंत माझे शिक्षण पूर्ण होणार होते. तेव्हा माझ्या वडिलांना समजले की, मला चित्रपटात काम करायचे आहे. त्यानंतर ‘बॉर्डर’मध्ये काम करण्याआधी त्यांनी माझ्यासाठी हिमालय पुत्र हा सिनेमा बनवला.

दरम्यान, अक्षय खन्ना लवकरच इक्का या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.