दिवंगत बॉलीवूड अभिनेते विनोद खन्ना यांनी करिअरमध्ये शिखरावर असताना चित्रपटसृष्टी सोडली होती. बॉलीवूड सोडून ते अमेरिकेतील ओरेगॉन येथे ओशो यांच्या आश्रमात निघून गेले होते. हे घडलं तेव्हा विनोद खन्ना इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक होते आणि त्यांच्या नावावर अनेक हिट चित्रपट होते. ते तेव्हाचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी होते, असं अनेकांना वाटत होतं. पण विनोद यांनी सगळं सोडून ओशो रजनीश यांच्या आश्रमात जायचा निर्णय घेतला. आता एका मुलाखतीत विनोद यांची दुसरी पत्नी कविता खन्ना यांनी खुलासा केला की, त्यांनी आईच्या मृत्यूनंतर अध्यात्माच्या शोधात यश आणि स्टारडम सोडून दिलं.
विनोद यांचा बालपणापासूनच अध्यात्माकडे कल होता. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांची ओशोंशी पहिली भेट झाली. “विनोद लहानपणापासूनच खूप आध्यात्मिक होताे. ते १७ वर्षांचे असताना त्यांनी ‘ऑटोबायोग्राफी ऑफ योगी’ हे पुस्तक विकत घेतलं होतं. पण त्यावेळी ओशो देखील त्याच पुस्तकांच्या दुकानात होते हे विनोद यांना माहित नव्हतं,” असं कविता खन्ना म्हणाल्या.
आईच्या निधनानंतर विनोद खन्नांनी घेतला होता सन्यांस
विनोद यांनी यशस्वी करिअर सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल कविता म्हणाल्या, “त्यांनी हे भौतिक आयुष्य, त्यांना मिळालेलं यश, प्रेम सर्व सोडण्याचा निर्णय कुटुंबातील काही सदस्यांच्या मृत्यूनंतर घेतला होता. त्यांच्या आईच्या निधनानंतर ते थेट ओशोंकडे गेले आणि त्यांनी संन्यास घेतला.”
माळी म्हणून काम करायचे विनोद खन्ना
सुपरस्टार विनोद खन्ना ओरेगॉन येथील आश्रमातील ओशोंच्या घरी माळी म्हणून काम करत होते. “ते ओशोंचे माळी होते. ओशोंचे घर प्रायव्हेट होते आणि फार कमी लोकांना तिथे प्रवेश मिळायचा,” असं कविता खन्ना यांनी सांगितल्या. याचबरोबर विनोद खन्ना यांनी ओशोंच्या डिझायनरसाठी मॉडेल म्हणूनही काम केलं होतं.
विनोद खन्ना यांची अध्यात्माप्रतीची ओढ ते मुंबईत राहत असतानाच सुरू झाली होती, असं कविता खन्ना यांनी सांगितलं. “पुण्यातील आश्रमात जाण्यापूर्वी ते मुंबईत असताना मुंबईच्या बीचवर ध्यान करत असे. हे बीच मुंबईच्या अगदी मध्यभागी आहे. तिथे सर्वजण आपले कपडे काढून, समुद्रकिनाऱ्यावर नग्न अवस्थेत ध्यान करत असत,” असं कविता खन्ना म्हणाल्या.
विनोद खन्ना नंतर बरीच वर्षे ओशोच्या आश्रमात राहत होते. मग ते भारतात परतले आणि २०१७ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी अभिनय करणं सुरू ठेवलं होतं.

