१९८२ मध्ये विनोद खन्ना यांचं करिअर यशाच्या शिखरावर होतं, तेव्हा त्यांनी अचानक बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे सुपरस्टार होते. आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी त्यांनी यश व लोकप्रियता सोडून ओशो यांच्या अमेरिकेतील (ओरेगॉन) आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी ध्यानधारणा आणि शिस्तप्रिय जीवन जगण्यास सुरुवात केली. त्यांच्या या निर्णयाचा त्यांच्या कुटुंबावरही याचा मोठा परिणाम झाला.
आपल्या निर्णयावर विनोद खन्ना काय म्हणाले होते?
विनोद खन्ना आपल्या निर्णयावर ठाम होते. आध्यात्मिक ओढीपोटी चित्रपटसृष्टी सोडत असल्याचं त्यांनी एका पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. सिमी गरेवालला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सविस्तर सांगितलं होतं. “हा निर्णय स्वार्थी होता का? तर हो! तुम्ही जोपर्यंत स्वार्थी होत नाही, तोपर्यंत असं काही करू शकत नाही. कारण स्वतःचा शोध घेण्यासाठी आणि उंची गाठण्यासाठी प्रत्येकाला एकट्यानेच प्रवास करावा लागतो. तुम्ही जसे एकटे येता आणि एकटे जाता, तसेच या मार्गावरही तुम्हाला एकट्यानेच चालावं लागतं,” असं ते म्हणाले होते. “मी माझ्या कुटुंबाच्या संपर्कात होतो. मी पळून गेलो नव्हतो, मी त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करत होतो,” असंही त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांबद्दल स्पष्ट केलं होतं.
या निर्णयामागचं कारण सांगताना ते म्हणालेले, “माझं मन खूप विचार करत होतं, मी खूप अस्वस्थ होतो. माझे विचार विखुरलेले होते आणि मला खूप राग यायचा. मी अशा एका टप्प्यावर पोहोचलो होतो जिथे लोक सहज मला चिडवू शकत होते. माझ्या नियंत्रणात काहीच नव्हतं. पण जेव्हा मी ध्यान करायचो, तेव्हा या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नसे. मला माझ्या मनाचं मालक व्हायचं होतं. मी पुरेसा पैसा कमावला होता… आता मला ध्यान करायचे होते, त्यासाठी मला पूर्ण वेळ देणं गरजेचं होतं. मला आश्रमात राहून माझ्या गुरूंच्या चरणाशी राहायचे होते. ही माझ्या मनातील ओढ होती.”
विनोद खन्ना यांच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल दुसऱ्या पत्नीची प्रतिक्रिया
विनोद खन्ना यांची दुसरी पत्नी कविता यांनी त्यांच्या आध्यात्मिक ओढीबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. “त्यांना अध्यात्माची ओढ नेहमीच होती. जेव्हा ते अवघ्या १७ वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध ‘स्ट्रँड बुकस्टॉल’मधून ‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ हे पुस्तक घेतलं होतं. ते पुस्तक त्यांनी रात्रभर जागून पूर्ण वाचून काढलं,” असं कविता म्हणाल्या होत्या. तसेच जेव्हा जेव्हा जे. कृष्णमूर्ती शहरात येत असत, तेव्हा विनोद खन्ना शूटिंगला न जाता त्यांची व्याख्याने ऐकायला जात असत
कविता यांच्यामते, विनोद खन्ना यांच्या आईसर कुटुंबातील पाच जवळच्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे ते खूप खचले होते. या कठीण काळात त्यांनी ओशोंची प्रवचनं ऐकायला सुरुवात केली. आईच्या निधनानंतर त्यांनी आश्रमात जाऊन संन्यास घेतला आणि तिथूनच त्यांचा खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रवास सुरू झाला.
आश्रमात राहूनही करत होते काम
एका महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा करताना कविता म्हणाल्या की, “अनेकांना हे माहित नाही की, संन्यास घेतल्यावरही सुरुवातीची तीन वर्षे ते काम करत होते. त्यांनी आधीच साईन केलेले चित्रपट पूर्ण करण्यासाठी ते आश्रमातून चित्रीकरणाला येत असत. यामध्ये ‘हेरा फेरी’ आणि ‘कुर्बानी’ सारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश होता.”
विनोद खन्ना त्या काळात खूप साधेपणाने राहायचे, असंही पत्नी कविता यांनी सांगितलं. “चित्रपटाचे शूटिंग कुठे बाहेर असेल तर ते तिथे जायचे, पण प्रामुख्याने ते पुण्यात असायचे. आश्रमात त्यांच्याकडे केवळ चार बाय सहा फूट आकाराची एक छोटीशी खोली होती. ती खोली इतकी लहान होती की ओशो सुद्धा त्याबद्दल विनोद करायचे. खोलीत जागाच नसल्यामुळे त्यांना बेडवरून पलीकडे जावे लागायचे आणि झोपतानाही तिरपे झोपावे लागायचे,” असं कविता म्हणाल्या.
विनोद खन्ना चित्रपट आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळत होते. “कॅमेऱ्यासमोर ते अभिनय करायचे आणि कॅमेरा बंद झाला की ते ध्यान करायचे. आश्रमात त्यांनी माळ्याचे कामही केले. त्यानंतर ते अमेरिकेतील ओरेगॉनला गेले,” असं कविता यांनी सांगितलं.
विनोद खन्ना आश्रमातून का परतले होते?
आध्यात्मिक समाधान मिळाल्याने विनोद खन्ना यांनी आश्रम का सोडले होते, असं कविता सांगतात. “मला वाटतं ते जे शोधत होते ते त्यांना मिळालं होतं. त्यामुळे त्यांना पुन्हा आश्रमात राहण्याची गरज वाटली नाही.”
