भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली, पत्नी अनुष्का अन् आपल्या दोन्ही मुलांसह गेल्या काही वर्षांपासून लंडनमध्ये राहतोय. तो फक्त क्रिकेट सामने खेळण्यासाठी आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठीच भारतात येतो. विराट कोहली व अनुष्का शर्मा या दोघांकडे मनोरंजनविश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. त्यांचे चाहते प्रेमाने त्यांना ‘विरुष्का’ म्हणतात. विरुष्काचे लंडनमधील अनेक फोटो अन् व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
विराट अन् अनुष्काच्या लंडनमध्ये स्थायिक होण्याच्या निर्णयाबाबत अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेनेंनी भाष्य केलं होतं. काही महिन्यांपूर्वी डॉ. नेने. रणवीर अलाहबादियाबरोबर पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. यावेळी अनुष्का आणि विराटने भारत सोडून लंडनला जाण्याचा निर्णय का घेतला? याविषयी त्यांनी माहिती दिली.
डॉ. श्रीराम नेने विराट-अनुष्काबद्दल सांगतात, “मी त्यांना अनेकदा भेटलोय आणि ते दोघंही खूपच चांगले आहेत. मी त्यांना जेव्हा भेटलो होतो…तेव्हा ते दोघंही कायमस्वरुपी लंडनला शिफ्ट होण्याच्या विचारात होते. कारण, आपल्याइथे त्या दोघांचीही मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात यश मिळवलंय, त्यामुळे त्यांचा चाहतावर्गही आहे. इथे राहून त्यांना कुटुंबाबरोबरचं वैयक्तिक आयुष्य हवं तसं एन्जॉय करता नाहीये. काहीही झालं तरी ते पटकन चर्चेत येतात.”
“अनुष्का आणि विराट लंडनला गेले कारण त्यांना त्यांच्या दोन्ही मुलांना इथल्या ग्लॅमरपासून दूर ठेवायचं आहे. अनुष्काला दोन्ही मुलांचं अतिशय सामान्यपणे संगोपन करून त्यांना वाढवायचं आहे. ते दोघंही खूपच चांगले आहेत. इथे जरा बाहेर गेलं तरी एखादा चाहता सेल्फी मागतो. अर्थात ही वाईट गोष्ट नाहीये पण, सतत असं होत असल्याने त्रास होऊ शकतो. आता विराट-अनुष्काबरोबर त्यांची मुलंही असतात त्यामुळेच त्यांना या सगळ्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी तो निर्णय घेतला आहे.” असं डॉ. श्रीराम नेनेंनी सांगितलं.
दरम्यान, विरुष्काची जोडी संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहेत. कपल गोल्स म्हणजेच विरुष्का असंही त्यांना म्हटलं जातं. या दोघांनी एका जाहिरातीत एकत्र काम केलं होतं…आणि तिथूनच यांची मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि २०१७ मध्ये विराट-अनुष्का लग्नबंधनात अडकले. २०२१ मध्ये अनुष्काने वामिकाला जन्म दिला. तर, २०२४ मध्ये अकायचा जन्म झाला. या जोडप्याने दोन्ही मुलांचे चेहरे सोशल मीडियावर आजवर रिव्हिल केलेले नाहीत.
