भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघंही आता लंडनमध्ये स्थायिक झाले आहेत. ‘विरुष्का’ने काही वर्षांपूर्वीच भारत सोडून परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाची सोशल मीडियावर सुद्धा बरीच चर्चा झाली, काही नेटकऱ्यांनी विराटला ट्रोल सुद्धा केलं होतं. यावर काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेने यांनी भाष्य केलं आहे. लाइमलाइटपासून दूर राहण्यासाठी आणि मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीकोनातून ‘विरुष्का’ने हा निर्णय घेतला असल्याचं डॉ. नेनेंनी सांगितलं.

माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी दिलखुलास गप्पा मारत, विराट कोहली आणि अनुष्का शर्माबरोबर भेट झाल्याची एक आठवण सांगितली आहे.

डॉ. नेने म्हणाले, “माझ्या मनात विराटबद्दल प्रचंड आदर आहे. बऱ्याचवेळा आमची भेट झालीये. माणूस म्हणून तो खरंच खूप चांगला आहे. अनुष्काशी सुद्धा मी बऱ्याच विषयांवर चर्चा केलीये. ज्यावेळी आम्ही भेटलो होतो…तेव्हा ते दोघंही लंडनला शिप्ट होण्याच्या विचारात होते. कारण, इथे त्यांना मनसोक्त जगता येत नाहीये. सेलिब्रिटी म्हणून त्यांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागत असेल, याचा अंदाज आम्हाला आहे. कारण, विराट-अनुष्काने जरा काही केलं की, सोशल मीडियावर त्याची चर्चा होती. माणसाच्या आयुष्यात प्रायव्हसी राहिलेली नाहीये. मग, या सगळ्यापासून अलिप्त राहावं असंही अनेकदा वाटतं.”

डॉ. नेने पुढे सांगतात, “एखाद्या व्यक्तीला सतत कॅमेरे फॉलो करत आहेत, त्याच्या सगळ्या गोष्टींवर सर्वांचं लक्ष असेल तर यामुळे दैनंदिन आयुष्यात जगणं कठीण होऊन बसतं. आता माझ्याबद्दल सांगायचं झालं तर, सुरुवातीला या गोष्टी माझ्यासाठीही नवीन होत्या. पण, माझा स्वभाव मुळातच बिनधास्त आहे…मी सर्वांमध्ये पटकन मिसळून जातो. पण, लोक तुमच्याकडे कधीही-कुठेही सेल्फी मागू शकतात. अशावेळी मग परिस्थिती हाताळणं कठीण होऊन बसतं. अनेकदा जेवताना वगैरे सेल्फी मागितला जातो. अशावेळी मग दुसऱ्याच्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप केल्यासारखं वाटतं. माझ्या पत्नीला सुद्धा अशा प्रसंगी परिस्थिती हाताळणं कठीण जातं. तसंच त्याचंही होत असेल.”

“विराट-अनुष्का स्वभावाने खूपच चांगले आहेत आणि आपल्या दोन्ही मुलांचं संगोपन अतिशय सामान्य पद्धतीने व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच त्यांनी लंडनमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला” असं डॉ. नेनेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, अनुष्का शर्मा व विराट कोहली काही वर्षांपूर्वीच आपली दोन्ही मुलं वामिका आणि अकायसह लंडनमध्ये स्थायिक झाले आहेत. लंडनमधील त्यांचे अनेक फोटो अन् व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.