रोमँटिक अॅक्शन ड्रामा चित्रपट ओ रोमियो शुक्रवारी १३ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, अविनाश तिवारी, फरीदा जलाल आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन ४ मध्ये हजेरी लावली. ओ रोमियोमध्ये नाना पाटेकर देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शोमध्ये विशाल भारद्वाज यांनी ओ रोमियोमध्ये पहिल्यांदाच नाना पाटेकरांबरोबर काम करण्याबद्दल सांगितलं.
कपिल शर्माने विशाल भारद्वाज यांना विचारलं की ते दोन दशकांहून अधिक काळापासून नाना पाटेकरांना ओळखतात, तरीही आजवर त्यांच्याबरोबर काम का केलं नाही. त्यावर उत्तर देत विशाल भारद्वाज म्हणाले, “खरं तर, ही माझी चूक आहे. मी यापूर्वी कधीही त्यांच्यासाठी अशी भूमिका लिहिली नव्हती. नाना पाटेकर खूप चांगल्या मनाचे आहेत. पण तरीही सर्वजण त्यांना खूप घाबरतात. मी त्यांच्याबरोबर काम केलं नाही, त्यामुळे ते माझ्यावर खूप नाराज होते. तो मला कुठेही दिसले की नाना पाटेकर नावाचा एक अभिनेता आहे, असं म्हणायचे. तसेच मी त्यांना चित्रपटात कधी घेईन, याबद्दल विचारायचे. मला या गोष्टीची खूप लाज वाटायची. आता इतक्या वर्षांनी अखेर आम्ही एकत्र काम केलं.”
कपिल शर्माने म्हटलं की नाना पाटेकर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फार जात नाहीत. तसेच अजून ते त्याच्या शोमध्येही आले नाहीत. हल्ली तर नाना पाटेकर एखाद्या कार्यक्रमाला जातात, यापेक्षा ते कार्यक्रमातून निघून जातात याच्या बातम्या जास्त व्हायरल होतात. कपिलने ‘ओ रोमियो’ ट्रेलर लाँचचा संदर्भ देत हे विधान केलं. कारण ट्रेलर लाँचला नाना वेळेवर पोहोचले होते, पण चित्रपटाच्या टीमने त्यांना एक तासापेक्षा जास्त वेळ ताटकळत ठेवल्याने ते चिडले आणि कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच निघून गेले.
नाना पाटेकर निघून गेल्यावर काय म्हणाले होते विशाल भारद्वाज?
ट्रेलर लाँचच्या वेळी विशाल भारद्वाज यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. “नाना कार्यक्रम सोडून निघून गेले आहेत, पण तरीही मी त्यांच्याबद्दल बोलू इच्छितो. नाना हे वर्गातील सर्वात खोडकर मुलासारखे आहेत, जो इतरांची मस्करी करतात आणि सर्वात जास्त मनोरंजनही करतात. मी त्यांना २७ वर्षांपासून ओळखतो, पण आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. जर ते इथे असते तर खूप छान वाटलं असतं. पण आम्ही त्यांना एक तास वाट पाहायला लावली, त्यामुळे ते त्यांच्या खास शैलीत कार्यक्रम सोडून निघून गेले. आम्हाला त्याबद्दल वाईट वाटलं नाही, कारण यामुळेच नाना पाटेकर नाना पाटेकर आहेत.”
ओ रोमियो चित्रपटातील कलाकार
ओ रोमियो हा विशाल भारद्वाज दिग्दर्शित आहे. याची निर्मिती नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने केली आहे. ओ रोमियोमध्ये शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, फरीदा जलाल, नाना पाटेकर, विक्रांत मॅस्सी, दिशा पटानी, तमन्ना आणि अविनाश तिवारी हे कलाकार आहेत. सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत २०.७५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

