Vishal Dadlani criticizes Dhurandhar 2: जेव्हा चित्रपट, मालिका, गाणी, वेब सीरिज प्रदर्शित होतात. त्यावेळी त्याची चर्चा होते. त्याबद्दल काय वाटते हे मोकळेपणाने सांगितले जाते. सध्या सोशल मीडियामुळे एखाद्या कलाकृतीबद्दल व्यक्त होणे सोपे झाले आहे.
अनेक चाहते त्यांना आवडणाऱ्या कलाकृतींबद्दल बऱ्याचदा व्यक्त होतात; तर न आवडलेल्या कलाकृतींवर टीकाही करतात. प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकारही व्यक्त होताना दिसतात.
काही दिवसांपासून धुरंधर २ या सिनेमाची चर्चा सुरू आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीपासूनच अॅडव्हान्स बुकिंगमधून सिनेमाने प्रचंड कमाई केली होती. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सगळीकडे धुरंधर या सिनेमाची चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळाले. काही जण सिनेमाचे कौतुक करत आहेत; तर काहींनी सिनेमावर टीकादेखील केली आहे.
विशाल ददलानी नेमकं काय म्हणाला?
आता लोकप्रिय संगीतकार व गायक विशाल ददलानीने सिनेमावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर करीत भावना व्यक्त केल्या आहेत. २२ मार्च रोजी गायकाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत चित्रपट किंवा दिग्दर्शकाचे नाव न लिहिता टीका केली आहे.
विशाल ददलानीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, मनोरंजनासाठी चित्रपट पाहा. पण, तुम्हाला जर माहिती मिळवायची असेल, तर ती माहिती चांगल्या स्रोतांमधून मिळवा, असे लिहिले आहे. सध्या ज्या पद्धतीने गोष्टी दाखवल्या जात आहेत, त्या सगळ्यात हे लक्षात ठेवले पाहिजे की, चित्रपट हे फक्त मनोरंजनासाठी आहेत. तथ्यं ही तथ्यं असतात. मग काहीही होऊ दे.

त्याबरोबरच गायकाने एक आर्टिकलदेखील शेअर केले. त्यामध्ये लिहिले आहे की, २०१६ मध्ये नोटबंदी केली; पण तरीही भारतावर होणारे दहशतवादी हल्ले बंद झाले नाहीत. २०१९ मध्ये पुलवामावर दहशतवादी हल्ला झाला आणि बॉर्डरवरसुद्धा सतत तणावाची स्थिती निर्माण झालेली असते. दहशतवाद्यांना जे पैसे पुरवले जातात, तो पुरवठा बंद व्हावा यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला गेला होता; पण या निर्णयानंतरही दहशतवादी हल्ले थांबले नाहीत.
‘धुरंधर २’मध्ये नोटबंदीचा एक सीन दाखवला आहे. त्यावरून विशाल ददलानीने ‘धुरंधर’ सिनेमावर टीका केल्याचे म्हटले जात आहे.
धुरंधर २ या सिनेमाबद्दल सध्या विविध मते मांडली जात आहेत. अनेक जण या सिनेमाला प्रोपगंडा, असेही म्हणत आहेत. तर अनेकांनी अक्षय खन्ना नसल्याने नाराजी व्यक्त केली. काहींना सिनेमाची गोष्ट आवडली नाही. तर अनेकांनी ‘धुरंधर’इतका ‘धुरंधर २’ उत्तम नसल्याचे मत व्यक्त करत आहेत. असे असले तरीही या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, फक्त भारतातच नाही, तर जगभरात हा सिनेमा गाजत आहे.
