गेल्या काही दिवसांपासून 'द केरला स्टोरी' चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळूनही हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही राज्यांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता नवाजुद्दी सिद्दीकीने 'द केरला स्टोरी'वर घालण्यात आलेल्या बंदीचे समर्थन केले होते. नवाजच्या या वक्तव्याचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ट्वीट करत अग्निहोत्री यांनी नवाजवर टीका केली आहे. हेही वाचा- “पोस्टरखाली सत्यघटनेवर आधारित लिहून…” ‘द केरला स्टोरी’बाबत कमल हासन यांचे स्पष्ट मत, म्हणाले… अग्निहोत्री यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे ''भारतातील बहुतांशी मध्यमवर्गीय कुटुंबाना सिनेमा आणि ओटीटी सीरिजमधनं कोणत्याही कारणाशिवाय अपमानित केलं जातं किंवा पीडित तरी दाखवलं जातं. नवाझुद्दिन सिद्दिकीच्या सिनेमांवर आणि ओटीटीवरील सीरिजवर बंदी आणायला हवी खरंतर. यावर तुमचं मत काय आहे?'' काही दिवसांपूर्वी नवाझुद्दिन सिद्दिकीनं 'द केरळ स्टोरी'वर काही राज्यात आणलेल्या बंदीचं समर्थन केलं होतं. मात्र त्यानंतर नवाजने या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं होतं आणि यावर स्पष्टीकरण देत म्हटलं होतं की 'कधीच कोणत्या सिनेमावर बंदी यावी असं मला चुकूनही वाटणार नाही'. सुदिप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल शाह निर्मित, 'द केरला स्टोरी' चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. एवढेच नाही तर तामिळनाडूमध्ये पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घातली होती. मात्र, सर्वेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम बंगालमधील चित्रपटावरील बंदी हटवण्यात आली आहे. हा चित्रपट आता पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटाने आत्तापर्यंत भारतात २१६.०७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने २५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे.