Vivek Agnihotri New Movie : ‘द कश्मीर फाइल्स’ , ‘द ताश्कंद फाइल्स’, ‘द बंगाल फाइल्स’ या गाजलेल्या चित्रपटांनंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. गुरुवार, २५ मार्च रोजी त्यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे या आगामी चित्रपटाबद्दलची माहिती दिली. विवेक अग्निहोत्री आता कोणत्या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत? चला जाणून घेऊ.

विवेक अग्निहोत्री आणि भूषण कुमार यांनी गुरुवार, २५ मार्च रोजी त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली, ज्याचं नाव आहे ‘ऑपरेशन सिंदूर’. २०२५ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या लष्करी हल्ल्याच्या सत्यघटनेवर हा चित्रपट आधारित आहे.

लेफ्टनंट जनरल के.जे.एस. ‘टिनी’ ढिल्लन यांच्या ‘ऑपरेशन सिंदूर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक्स इनसाईड पाकिस्तान’ या पुस्तकावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री करणार असून भूषण कुमार यांची ‘टी-सीरीज’ आणि विवेक अग्निहोत्री यांची ‘आय एम बुद्धा प्रोडक्शन्स’ संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

Award Banner

‘ऑपरेशन सिंदूर’ चित्रपटाबद्दल भूषण कुमार म्हणाले…

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, या चित्रपटाबद्दल भूषण कुमार यांनी म्हटले, “काही कथा आपण निवडत नाही, तर त्या कथाच आपल्याला निवडत असतात, ‘ऑपरेशन सिंदूर’ ही त्यापैकीच एक आहे. २०२५ मध्ये पहलगाममध्ये झालेल्या घटनेत निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. यावर ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने चोख प्रत्युत्तर दिले होते. ही गोष्ट जगासमोर येणे आवश्यक आहे. हा केवळ चित्रपट नसून देशाच्या इतिहासातील एका मोठ्या घटनेचा दस्तऐवज आहे.”

‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया

तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीसुद्धा याबद्दल प्रतिक्रिया दिली. “या चित्रपटाच्या माध्यमातून भारताने केवळ पहलगाम हल्ल्याचा बदला घेऊन पाकिस्तानला शिक्षा दिली नाही, तर आधुनिक युद्धशास्त्रातील आपली ताकदही जगाला दाखवून दिली. या मोहिमेत नेमके काय, कसे आणि का घडले हे समजून घेण्यासाठी भारतीय सशस्त्र दलाच्या विविध विभागांच्या सहकार्याने संशोधन करण्यात आले आहे. लोकांपर्यंत पोहोचलेल्या माहितीपेक्षा ही वस्तुस्थिती खूपच अस्वस्थ करणारी आहे” असे त्यांनी म्हटले.

पुढे विवेक अग्निहोत्री ‘हा चित्रपट प्रेक्षकांना एक थरारक अनुभव देईल. तसेच तथ्यांच्या आधारे सत्य समोर आणण्याचा प्रयत्न ते या चित्रपटाच्या माध्यमातून करणार आहेत’, असेही म्हणाले. दरम्यान, या चित्रपटातील कलाकार आणि प्रदर्शनाच्या तारखेबाबतची अधिक माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. ‘द ताश्कंद फाईल्स’, ‘द काश्मीर फाईल्स’ अन् ‘द बंगाल फाईल्स’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांनंतर आता विवेक अग्निहोत्री यांच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मधून कोणती गोष्ट प्रेक्षकांसमोर आणणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.