"मी चित्रपट..." 'द काश्मीर फाइल्स'च्या विरोधात बोलणाऱ्यांना विवेक अग्निहोत्री यांचं थेट आव्हान; व्हिडिओ व्हायरल | vivek agnihotri challenges if there is anything wrong in the kashmir files he will quit industry | Loksatta

“….तर मी चित्रपट बनवणं सोडून देईन”; ‘काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचं खुलं आव्हान

‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाला भारतात प्रदर्शित करण्याआधी इतर देशांमध्ये दाखवण्यात आलं होतं

“….तर मी चित्रपट बनवणं सोडून देईन”; ‘काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचं खुलं आव्हान
विवेक अग्निहोत्री (सोशल मीडिया)

गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शेवट एका वेगळ्याच वळणावर झाला. ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपटनिर्माते नदाव लॅपिड यांनी मनोगत व्यक्त करताना दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर निशाण साधला. त्यांच्या मते हा एक ‘प्रोपगंडा’ आणि ‘वल्गर’ चित्रपट आहे. हे त्यांनी तिथल्या मंचावर उघडपणे बोलून दाखवलं आणि वादाला तोंड फुटलं. आधीच वादातीत असलेल्या या चित्रपटावर केलेल्या टिप्पणीमुळे दोन्ही बाजूकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. या चित्रपटाचा सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या लोकांनी ज्युरी यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं तर या चित्रपटाला डोक्यावर घेणाऱ्या काही लोकांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

मनोरंजनसृष्टीतील काही लोकांनी याबद्दल खेद व्यक्त केला. या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांनीही याबद्दल खंत व्यक्त केली असून विवेक अग्निहोत्री यांनीसुद्धा ट्वीट करत याबद्दल अप्रत्यक्षपणे भूमिका घेतली होती. ‘द काश्मीर फाइल्स’ हा यावर्षीच्या सर्वाधिक कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटाने ३०० कोटीहून अधिक कमाई केली. आता चित्रपट महोत्सवातील या वादामुळे हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे.

आणखी वाचा : ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ‘प्रचारकी’ असेल, तर मग इस्रायलच्या बहुचर्चित ‘फौदा’ या वेबसीरिजला काय म्हणावं?

नुकतंच या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची बाजू मांडली आहे. इतकंच नाही तर जर काही चुकीचं दाखवलं असेल तर मनोरंजनसृष्टी सोडायला तयार आहे असा दावाही त्यांनी केला आहे. व्हिडिओमध्ये विवेक म्हणतात. “या चित्रपटाला नावं ठेवणं ही माझ्यासाठी काही नवी गोष्ट नाही. आतंकवादी संघटना, अर्बन नॅक्सल्स आणि भारताचे तुकडे करू पाहणाऱ्या लोकांचं हे नेहमीचं काम आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की भारत सरकारच्या कार्यक्रमात भारत सरकारच्या मंचावर काश्मीरला भारतापासून वेगळं करण्याच्या विचारधारेला पाठिंबा दिला गेला. मी ४ वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहे, तेव्हापासून ही लोक या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत आहे. ७०० पीडित लोकांच्या मुलाखती घेऊन आम्ही हा चित्रपट सादर केला आहे, ती ७०० माणसं काय प्रोपगंडा आणि अश्लील गोष्टी सांगत होती का? आजही काश्मीरमध्ये हिंदू लोकांना मारलं जातं, हा प्रोपगंडा आहे का? आज मी या महान बुद्धिजीवी लोकांना या महान इस्रायलच्या चित्रपटनिर्मात्यांना आव्हान देतो, की या चित्रपटातील एक जरी दृश्यं, डायलॉग, घटना सत्य नसल्याचं सिद्ध केलंत तर मी चित्रपट बनवणं सोडून देईन. भारताविरोधात उभी राहणारी ही मंडळी आहेत तरी कोण? मी घाबरणारा माणूस नाही, मी शेवटपर्यंत लढत राहीन.”

सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी विवेक अग्निहोत्री यांना टॅग करून यावर व्यक्त होण्याची विनंती केली होती. ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाला भारतात प्रदर्शित करण्याआधी इतर देशांमध्ये दाखवण्यात आलं होतं. शिवाय या चित्रपटाला भारतात अभूतपूर्व असं यश मिळालं होतं. या चित्रपटाच्या यशानंतर विवेक अग्निहोत्री कोविड काळातील लसीकरण या विषयावर चित्रपट आपल्यासाठी घेऊन येत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 17:03 IST
Next Story
“ती अतिशय…” शम्मी कपूर यांची एक अट अन् मुमताज यांनी संपवलं होतं नातं