Vivek Agnihotri Says Americans No About Kashmi : २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून हवाई हल्ले केले होते. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी केंद्रांवर अचूक हल्ले करून प्रत्युत्तर दिले होते. पाकिस्तानने भारतीय शहरांना लक्ष्य करत हल्ले केल्याचे प्रयत्न केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता.
भारत-पाकिस्तान यांच्यातील हा तणाव वाढीला लागलेला असताना अमेरिकेने मध्यस्थी करून दोन्ही देशांत शस्त्रविराम जाहीर केला होता. भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर शस्त्रविरामाचा तोडगा काढल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. अशातच आता भारत-पाकिस्तानच्या या संघर्षावरील अमेरिकेच्या दृष्टिकोनाबद्दल दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी भाष्य केलं आहे.
इंडिया टुडे डिजिटलला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, विवेक अग्निहोत्रींनी अमेरिकेतील लोकांना काश्मीर आणि त्याच्या समस्यांबद्दल माहीत नसल्याचं म्हटलं. याबद्दल ते म्हणाले, “भारतात आपण काश्मीरबद्दल प्रश्न विचारत राहतो, वादविवाद करत राहतो आणि म्हणूनच पाकिस्तानबरोबरच्या या संघर्षात अमेरिकन लोकांनी काश्मीरचा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण त्यांना याबद्दल माहीत नाही आणि त्यांना जाणीवही नाही. मी नुकताच अमेरिकेहून परतलो आहे आणि मला माहीत आहे की, त्यांना या प्रदेशाबद्दल किंवा हा प्रदेश कसा चालतो? याबद्दल अजिबात कल्पना नाही.”
‘काश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे विवेक अग्नीहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दलही यावेळी सांगितलं. याबद्दल ते म्हणाले, “माझा पुढचा चित्रपट बंगालवर आहे. आशा आहे की, त्याचे नाव ‘द बंगाल फाइल्स’ असेल. आम्ही हे खूप काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणे हाताळले आहे. कारण कोणालाही दोष देण्याची आमची कल्पना नाही. जेव्हा एखाद्या प्रदेशात मानवता नसते आणि कोणीही त्याची पर्वा करत नाही तेव्हा काय होते हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
यापुढे त्यांनी सांगितलं, “या चित्रपटावरही बरीच टीका होईल, पण त्यामुळे मी ‘सत्य’ बोलण्यापासून परावृत्त होणार नाही. बंगाल आता दुसरे काश्मीर बनले आहे. मला माहित आहे की, जेव्हा माझा चित्रपट येईल तेव्हा लोक पुन्हा म्हणतील की, ‘हे काय आहे?’ पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी बरोबर असल्याचे सिद्ध होईल. कारण मी चित्रपट करायचे म्हणून करत नाही. माझ्यासाठी ते माझ्या आयुष्याचे ध्येय आहे.” दरम्यान, अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता.