scorecardresearch

“यापुढे काश्मिरी हिंदूंना टार्गेट केल्यास…” विवेक अग्निहोत्रींनी दिला थेट इशारा

काही दिवसांपूर्वीच इस्रायली निर्माते नदाव लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट अश्लील आणि विशिष्ट हेतूचा प्रचारक असल्याचं म्हणत टीका केली होती

“यापुढे काश्मिरी हिंदूंना टार्गेट केल्यास…” विवेक अग्निहोत्रींनी दिला थेट इशारा
विवेक अग्निहोत्री यांनी एक ट्वीट करत थेट इशारा दिला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री देशात घडणाऱ्या घटनांवर नेहमीच बोलताना दिसतात. देशातील प्रत्येक मुद्द्यावर ते आपलं मत मांडताना दिसतात. पण त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा त्यांना ट्रोलही केलं जातं. काही दिवसांपूर्वीच इस्रायली निर्माते नदाव लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट अश्लील आणि विशिष्ट हेतूचा प्रचारक असल्याचं म्हणत टीका केली होती. त्यावरून नवा वाद सुरू झाल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी एक ट्वीट करत थेट इशारा दिला आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी दावा केला की भारत सरकारच्या एका व्यासपीठावरून रेझिस्टन्स फ्रंटला ‘वैचारिक पाठिंबा’ दिला जात होता. गेल्या आठवड्यात गोव्यातील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लॅपिड यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटावर टीका केली होती. अग्निहोत्री यांनी दावा केला आहे की, ‘भारत सरकारचं व्यासपीठ IFFI2022 ने उघडपणे इस्लामिक दहशतवाद्यांना वैचारिक पाठिंबा दिल्यानंतर एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीच, द रेझिस्टन्स फ्रंटने त्यांच्या दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेल्या काश्मिरी हिंदूंची यादी जारी केली आहे.’

आणखी वाचा- नदाव लॅपिड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ‘द केरळ स्टोरी’च्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया, म्हणाले “हे अनैतिक…”

आपल्या ट्वीटमध्ये काही फोटो शेअर करताना विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं, “जर यापुढे काश्मिरमध्ये कोणत्याही हिंदूवर हल्ला झाला तर तुम्हाला माहीतच आहे की कोणाचे हात रक्ताने रंगलेले आहेत. कृपया हे ट्वीट गांभीर्याने घ्या.” या ट्वीटसह त्यांनी गोव्यातील एका चित्रपट महोत्सवात लॅपिड बोलत असल्याचे आणि जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात दावा केला आहे की भाजपा मुस्लिमांनांची, विशेषत: काश्मिरी लोकांची राक्षसी प्रतिमा दाखवणाऱ्या चित्रपटाचा प्रचार करते. अग्निहोत्री यांनी काश्मिर फाइट्स डॉटकॉम वरूनही काही फोटो संकलित केले आहेत, ज्यात काश्मिरी हिंदू सरकारी कर्मचार्‍यांची हत्या करण्यात आल्याचा दावा केला होता.

अग्निहोत्रीने ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, ‘पहिल्या आणि दुसऱ्या फोटोत कारण आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या फोटोमध्ये त्याचा प्रभाव’. लॅपिड हे पुरस्कार विजेता चित्रपट निर्माता, गोवा चित्रपट महोत्सवात ज्युरींचे अध्यक्ष होते. त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ला ‘प्रोपगंडा चित्रपट’ असून त्याला कोणत्याही चित्रपट महोत्सवात स्थान दिलं जाऊ नये असं म्हटलं होतं.

आणखी वाचा- “काँग्रेस, आप आणि बेरोजगार…” आलिशान घरावरून ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची तिरकस पोस्ट

चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी इस्रायलच्या एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, “आक्रोश पाहून मी हैराण झालो होतो आणि यावर कोणीतरी बोलण्याची गरज आहे. पण कोणीच यावर बोललं नाही.” दरम्यान त्यांनी नंतर आपल्या वक्तव्याची माफी मागितली होती. बोलण्यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असं त्यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 08:00 IST

संबंधित बातम्या