अभिनेता विवेक ओबेरॉय आणि कोरिओग्राफर जोडी बॉस्को-सीझर यांची कॉलेजच्या दिवसांपासूनची घट्ट मैत्री आहे. विवेक हा दोघांचा चांगला मित्र आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत बॉस्को-सीझर यांनी विवेकशी संबंधित एक मजेशीर किस्सा सांगितला. बॉस्कोने सांगितलं की, तो कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सीझर आणि त्याच्या तेव्हाच्या गर्लफ्रेंडबरोबर बसला होता. त्यावेळी सीझरच्या गर्लफ्रेंडने बॉस्कोला काहीतरी उद्धटपणे सांगितलं. हे ऐकून विवेकने हातात असलेलं आईस्क्रीम थेट तिच्यावर फेकलं.
हा प्रकार पाहून बॉस्कोला धक्काच बसला. मात्र, त्याचवेळी त्यांना हेही जाणवलं की विवेक त्यांचा खरा मित्र आहे यानंतर विवेकने मजेशीरपणे सीझरला म्हटलं, “तुझ्यासाठी इतक्या सुंदर मुलीचा त्याग केला.” यानंतर बॉस्को मार्टिस यांच्या प्रेमप्रकरणाबद्दलही चर्चा झाली. बॉस्कोने सांगितलं की, तो एका मुलीच्या प्रेमात असताना विवेक ओबेरॉयने त्याला तिच्यापासून ब्रेकअप करण्याचा सल्ला दिला होता. ती मुलगी बॉस्कोचा वापर करत असल्याचं विवेकला वाटत होतं. मात्र, नंतर विवेकनेच त्या मुलीला डेट करण्यास सुरुवात केली. याबद्दल बोलताना बॉस्को म्हणाला, “पण त्यानंतर तुम्ही दोघांनी माझा बदला घेतला. माझ्याबरोबर खूप चुकीचा खेळ खेळलात. जिच्यावर मी वेड्यासारखं प्रेम करत होतो, ती माझ्यासाठी योग्य नाही आणि माझा वापर करतेय असं तुम्हा दोघांना वाटत होतं.”
विवेकने बॉस्कोला सांगितलं होतं, “ती तुझा वापर करत होती.” यावर बॉस्को म्हणाला, “पण त्यावेळी मला वाटलं की तुम्ही दोघे माझ्या भावनांशी खेळलात. ती माझी एक्स होती आणि कदाचित माझी गर्लफ्रेंडही राहिली असती. पण विवेकने तिला डेट केलं आणि माझ्यासमोर तिच्याबरोबर रेन डान्सही केला.” यावर विवेकने मजेशीरपणे सगळं सीझर गोंसाल्विसच्या माथी मारत म्हटलं, “ही कल्पना सीझरची होती.”
विवेक ओबेरॉयच्या वागण्यामुळे दुखावलेला बॉस्को
याच मुलाखतीत बॉस्को मार्टिसने विवेक ओबेरॉयच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांतील एक किस्सा सांगितला. २००२ मध्ये ‘कंपनी’ आणि त्यानंतर ‘साथिया’ चित्रपटांमुळे विवेकला मोठं यश मिळालं होतं. त्यावेळी बराच काळ संपर्कात नसतानाही बॉस्कोने विवेकला फोन करून त्याच्याबरोबर एक गाणं करण्याची इच्छा व्यक्त केली. विवेकने गाणं नक्की करायला हवं असं सांगितलं, मात्र त्यानंतर “क्रिएटिव्ह्ज तयार करा आणि मला त्याचा ब्रेकडाउन द्या,” असंही म्हणाला. विवेकने हे इतक्या स्पष्टपणे सांगितल्यामुळे बॉस्कोला सुरुवातीला वाईट वाटलं. मात्र नंतर त्यांना विवेकचं म्हणणं योग्य असल्याचं जाणवलं. स्टारसोबत काम करताना त्याला योग्य पद्धतीने कसं सादर करायचं, याची तयारी असणं गरजेचं आहे, असं बॉस्को म्हणाला. यावर विवेकने सांगितलं की, “काम म्हणजे काम. काम आणि मैत्री वेगळी ठेवायला हवी. मैत्री आहे म्हणून काम गृहीत धरू नये. तसं केलं तर तुम्ही लवकरच खाली याल.”
