Vivek Oberoi Dubai House Inside Photos: बॉलीवूड अभिनेता आणि बिझनेसमन विवेक ओबेरॉय सध्या आपल्या दुबईतील आलिशान व्हिलामुळे चर्चेत आला आहे. १,२२० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीचा मालक असलेला विवेक गेल्या पाच वर्षांपासून दुबईत स्थायिक असून कामानिमित्त मुंबईत येत असतो. त्याच्या या भव्य व्हिलामध्ये भारतीय संस्कृती आणि युरोपीय शैलीचा अद्भूत संगम पाहायला मिळतो. घरात सुंदर फर्निचर, व्हिंटेज आर्टवर्क, लाइव्ह किचन, मोठा स्विमिंग पूल आणि आउटडोअर लाउंज आहे. विशेष म्हणजे विवेकच्या बागेत कढीपत्ता, मसाल्यांची रोपे आणि सेंद्रिय भाजीपाला पिकवला जातो, ज्यामुळे वाळवंटात असूनही त्याला भारतात असल्यासारखा अनुभव मिळतो.
विवेक ओबेरॉयच्या या आलिशान व्हिलामध्ये अनेक गाड्या पार्क करण्यासाठी पुरेशी जागा आहे. मुख्य दरवाज्याजवळ सुंदर बाग आहे. घराच्या आत प्रवेश करताच एक सुंदर सजवलेली लिव्हिंग स्पेस आहे, तिथे भारतीय आणि युरोपीय शैलीचा मिलाफ पाहायला मिळतो.

घराच्या मुख्य दरवाजात एक बाग आहे, तिथे लागूनच एक औपचारिक ड्रॉइंग रूम आहे. रुममध्ये सोफा ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर भिंतींवर आर्टवर्क लावलेले आहे. “हे आर्ट कलेक्शन्स माझे आहेत. सगळे भारतीय कलाकारांनी तयार केले आहेत. बाकी सगळं प्रियांकाने केलंय. तिला व्हिंटेज शैली खूप आवडते,” असं विवेक ओबेरॉयने ‘द कर्ली टेल्स’ला सांगितलं.

या व्हिलाच्या मागच्या बाजूला एक सुंदर गोल टेबल असलेला डायनिंग एरिया देखील आहे. इथे मनोरंजनसाठी टीव्ही बसवण्यात आला आहे. कुटुंबाबरोबर वेळ घालवायला ही उत्तम जागा आहे. याला लागूनच एक सुसज्ज किचन आहे, त्याला ब्रेकफास्ट काउंटर आहे, ज्यामुळे ते लाइव्ह किचनसारखं वाटतं.

विवेक ओबेरॉयच्या बागेत पिकतो सेंद्रिय भाजीपाला
विवेक ओबेरॉयच्या या घरात अनेक रोपटी पाहायला मिळतात. लिव्हिंग एरियापासून ते व्हिलाच्या विविध कोपऱ्यांपर्यंत हिरवळ पसरलेली आहे. गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ दुबईत राहणाऱ्या विवेक ओबेरॉयला गार्डनिंगची खूप आवड आहे. बागेतही त्यांचं झाडांवरील प्रेम दिसून येतं. कढीपत्ता व मसाल्यांची रोपं त्यांच्या बागेत आहेत. त्याचबरोबर ते सेंद्रिय पद्धतीने भाजीपालाही पिकवतात. यामुळे दुबईत राहत असला तरी विवेकला भारतात असल्यासारखं वाटतं. “हे सगळं बघून तुम्ही वाळवंटात राहताय, असं जाणवतच नाही,” असं विवेक म्हणाला.

या व्हिलाचा बॅकयार्ड खूप मोठा आहे. इथे एक मोठा स्विमिंग पूल आहे. तसेच पर्गोलाने झाकलेले आउटडोअर लाउंज आहे. ही जागा निवडण्यामागचं कारण विवेक ओबेरॉयने सांगितलं. “प्रियांकाला अशी जागा हवी होती जिथे तिला पाणी दिसेल आणि दररोज सकाळी पक्षांचा किलबिलाट ऐकू येईल.”

दरम्यान, विवक दुबईतील एक यशस्वी बिझनेसमन असला, तरी तो आपल्या कौटुंबिक आयुष्यातील साधेपणाला महत्त्व देतो. त्याला संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत घरी परतणं, मुलांबरोबर वेळ घालवणं, फुटबॉल खेळणं आणि सकाळी बॅकयार्डमध्ये निवांत बसणं फार आवडतं.
