Vivek Oberoi on Shahrukh khan: बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या अभिनयाचा मोठा चाहतावर्ग आहे. यामध्ये शाहरुख खानचे नाव घेतले जाते. शाहरुख खानने त्याच्या कारकिर्दीत सकारात्मक, नकारात्मक अशा विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. आजही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.
विशेष म्हणजे फक्त प्रेक्षकच त्याचे चाहते नाहीत, तर अनेक कलाकारही शाहरुख खानचे चाहते आहेत. अनेकांना त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळावी अशी इच्छा असते, तर अनेक लोकप्रिय कलाकार त्याच्याबद्दल बोलताना दिसतात. त्याचा स्वभाव, वागणे, कामाच्या ठिकाणी तो कसा वागतो, तो इतरांना कशी वागणूक देतो याबद्दल अनेक कलाकार त्यांचे अनुभव सांगत असतात. अनेक अभिनेत्रीही शाहरुख खानचे कौतुक करताना दिसतात.
“मी शाहरुख खानचा…”
लोकप्रिय अभिनेता विवेक ओबेरॉयने शाहरुख खानबद्दल वक्तव्य केले आहे. अभिनेत्याने मिर्ची प्लसला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, “मी शाहरुख खानचा मोठा चाहता आहे. अगदी मी शाळेत, कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून मी त्याचा चाहता आहे. मला त्याचे चित्रपट खूप आवडायचे. आयुष्य असो किंवा सिनेमा, तो ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करतो, मला त्याचं कौतुक वाटतं, त्यामुळे मी त्याचा मोठा चाहता आहे.”
पुढे तो म्हणाला, “मी खूप भाग्यशाली आहे की त्याला एक मित्र, हितचिंतक आणि मार्गदर्शक म्हणून जाणून घेण्याची संधी मिळाली. त्याने मला कायमच प्रेम दिले आहे, त्यामुळे गोष्टींकडे पाहण्याचा एक चांगला दृष्टिकोन मिळाला. लोकांकडून प्रेरणा घ्यायला मला आवडते. तो एक अद्भुत व्यक्ती आहे, तो शाहरुख खान आहे. एक मेगा स्टार आहे, पण तो मुलांबरोबर जमिनीवर बसतो. मुलांसाठी तो वेळ काढतो. त्याने माझे मन जिंकले आहे”, असे म्हणत विवेक ओबेरॉयने शाहरुख खानचे कौतुक केले आहे.
याआधीही अनेक कलाकारांनी शाहरुख खानचे कौतुक केले आहे. शाहरुख त्याच्याबरोबर काम करणाऱ्या कलाकारांशी आदराने आणि प्रेमाने वागतो. तसेच त्याच्या घरी कोणी गेले असेल तर तो त्यांचे उत्तम आदरातिथ्य करतो.
विवेक व शाहरुख खानने कधीच एकत्र काम केले नाही. २००२ मध्ये ‘साथिया’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात विवेक प्रमुख भूमिकेत होता. शाहरुख खानने यात कॅमिओ केला होता.
दरम्यान, शाहरुख खान लवकरच ‘द किंग’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
