विवेक ओबेरॉयला त्याच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. २००२ मध्ये त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. विवेकचा पहिलाच सिनेमा ‘कंपनी’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. मात्र, त्यानंतर विवेकच्या आयुष्यात अशी उलथापालथ झाली की, फिल्म इंडस्ट्रीत जवळपास १४ ते १५ महिने त्याच्याकडे काहीच काम नव्हतं. याशिवाय २००३ मध्ये विवेकने सलमान खान विरोधात एक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्याने सलमानवर बरेच गंभीर आरोप केले होते.

सलमान-ऐश्वर्याचं ब्रेकअप झाल्यावर, सिनेइंडस्ट्रीत ऐश्वर्या-विवेकच्या नात्याची बरीच चर्चा झाली. ऐश्वर्या रायमुळे सलमान खान मला धमकी देत आहे, असं वक्तव्य विवेकने या पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं. पण, यानंतर अभिनेत्याला त्याच्या करिअरमध्ये बराच संघर्ष करावा लागला. त्याला कुठेही काम मिळत नव्हतं. नवीन चित्रपटाच्या ऑफर मिळत नव्हत्या. एकंदर बॉलीवूडमधून त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता.

प्रसिद्ध निर्माते शैलेंद्र सिंग यांनी सिद्धार्थ कन्ननशी संवाद साधताना सलमान-विवेकच्या वादावर भाष्य केलं होतं. ते म्हणाले, “सलमान तेव्हा खूप जास्त संतापला होता…आता त्याचं रागावर खूप जास्त नियंत्रण असतं पण, आधी त्याचा स्वभाव असा नव्हता.” सलमानने विवेकच्या पत्रकार परिषदेनंतर या सगळ्या प्रकरणावर शांत राहून लढा दिला असा दावा निर्मात्यांनी केला आहे.

शैलेंद्र सिंग पुढे म्हणाले, “सलमानला जे करायचं होतं ते त्याने शांतपणे केलं. विवेकला बॉलीवूडमध्ये कुठेही काम मिळणार नाही याची खबरदारी त्याने घेतली. अर्थात मला याबाबत नक्की माहिती नाही पण, परिस्थिती एकंदर परिस्थिती तशीच होती.”

या पत्रकार परिषदेच्या वादानंतर चित्रपटसृष्टीत आपल्या विरोधात ‘लॉबिंग’ (गटबाजी) झाल्याचं विवेकने यापूर्वी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ या सिनेमानंतर विवेकचं सर्वत्र भरपूर कौतुक करण्यात आलं. पण, तरीही त्याला कुठेच काम मिळत नव्हतं. विवेक सांगतो, “शूटआउट ॲट लोखंडवाला’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं, या चित्रपटाला बरेच पुरस्कारही मिळाले पण, त्यानंतर मला १४ महिने घरीच बसावं लागलं. कारण, मला इंडस्ट्रीत कुठेच काम मिळत नव्हतं. त्यामुळे मी बिझनेसकडे वळण्याचा निर्णय घेतला.”

“अभिनय क्षेत्रातील करिअर धोक्यात असताना मला व्यवसायामुळे सावरता आलं. वडिलांमुळे लहानपणापासूनच मला गुंतवणुकीची सवय लागली होती. मी कधीही कोणाकडूनही पैसे मागितले नाहीत, अगदी माझ्या वडिलांनाही मी पैशांबद्दल कधीच विचारलं नाही. कोणाकडून मदत मागण्यापेक्षा मी सक्रियपणे व्यवसाय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. रिअल इस्टेटमध्ये आलो, काही कंपन्या स्थापन केल्या, काही तांत्रिक क्षेत्राशी संबंधित कंपन्या खूप मोठ्या झाल्या. आज मी जवळपास २९ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.” असं विवेक ओबेरॉयने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना सांगितलं होतं.