Vivek Vaswani On Salman Khan : दिग्दर्शक अनंत बलानी यांच्या ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून अभिनेत्री रवीना टंडनने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात रवीनाबरोबर अभिनेता सलमान खानही मुख्य भूमिकेत होता. विवेक वासवानी हे या चित्रपटाचे निर्माते होते. पण या चित्रपटानंतर वासवानी यांनी पुन्हा सलमान खानबरोबर कधीच एकत्र काम केले नाही.
नुकत्याच एका मुलाखतीत वासवानी यांनी सलमानबरोबर काम न करण्याचं कारण सांगितलं. विकी लालवानी यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना विवेक वासवानी म्हणाले की, त्यांना शिस्तबद्ध वातावरणात काम करायला आवडतं आणि काही अटी पूर्ण झाल्या, तरच ते पुन्हा सलमानबरोबर काम करतील.
“लोक दारू पिऊन बेशिस्तपणे काम करतात”
या मुलाखतीत वासवानी यांनी तुम्हाला पुन्हा सलमानबरोबर काम करावेसे वाटले नाही का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वासवानी यांनी स्पष्टपणे ‘नाही’, असं उत्तर दिले आणि पुढे म्हणाले, “ज्या ठिकाणी दारू प्यायली जाते आणि लोक बेशिस्तपणे काम करतात, अशा वातावरणात मी काम करू शकत नाही. मात्र, जर मला तो सलमान भेटला, जो सूरज बडजात्या यांच्याबरोबर काम करतो, तर मी नक्कीच त्याच्याबरोबर काम करेन. कारण- त्यांच्याकडे सलमान प्रोफेशनलपणे काम करतो.”
“जेव्हा मला अभिनेता सलमान मिळेल, तेव्हा मी…”
विवेक यांनी पुढे सांगितले की, भन्साळी किंवा बडजात्या हे मोठे बॅनर्स असल्यामुळे सलमान प्रोफेशनल पद्धतीने काम करतो. ते म्हणाले, “हे असे निर्माते आहेत, जे सलमानच्या नावावर चित्रपट बनवत नाहीत. त्यांना ‘स्टार’ सलमान नव्हे, तर त्यांना ‘अभिनेता’ सलमान हवा असतो. मलासुद्धा जेव्हा अभिनेता सलमान मिळेल, तेव्हाच मी त्याच्याबरोबर काम करेन.”
“मला बेशिस्त अजिबात आवडत नाही. जर शिफ्ट सकाळी ९ वाजता सुरू होणार असेल, तर तुम्ही संध्याकाळी ४ वाजता येऊ शकत नाही. हे मला मुळीच मान्य नाही. तुम्हाला काही बदल सुचवायचे असतील, तर लवकर या, दिग्दर्शकाबरोबर बसा आणि त्यावर नीट चर्चा करा”, असंही पुढे ते म्हणाले.
दरम्यान, ‘पत्थर के फूल’ चित्रपटाच्या आठवणी सांगताना विवेक म्हणाले की, त्या चित्रपटाची पटकथा सलमानचे वडील सलीम खान यांनी लिहिली होती. सलमान कधी कधी काही बदल सुचवायचा; पण सलीम खान एक शब्दही बदलू द्यायचे नाहीत. सलमान एखाद्या सीनवर चर्चा करताना खूप विचार करायचा आणि त्याचे सुचवलेले बदल वाईट नसायचे, असेही वासवानी यांनी नमूद केले.
