Wamiqa Gabbi Reveals About First Meeting With Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. लवकरच तो ‘किंग’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किंग खानबरोबर काम केलेले अनेक कलाकार त्याच्याबद्दल बोलतात. त्याच्याबद्दलचे अनेक किस्से ते सांगत असतात.
शाहरुख खान ज्या पद्धतीने त्याच्या सहकलाकारांशी, त्याच्या सहवासात आलेल्या लोकांबरोबर वागतो, त्याचे कौतुक होताना दिसते. अनेक कलाकार शाहरुखचे कौतुक करताना दिसतात. आता अभिनेत्री वामिका गब्बीनेदेखील शाहरुख खानबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिचे वक्तव्य सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्री बॉलीवूडच्या किंग खानबद्दल नेमके काय म्हणाली, ते जाणून घेऊ…
वामिका गब्बीने नुकताच ‘माशाबल इंडिया’शी संवाद साधला. त्यावेळी तिने शाहरुख खानबरोबर तिची पहिली भेट कशी होती आणि त्यावेळी काय घडलं होतं, याबद्दल खुलासा केला. ‘बेबी जॉन’ चित्रपटाचा मुहूर्त होता, त्यावेळी शाहरुख खान १५ मिनिटांसाठी सेटवर आला होता. त्यावेळी माझा भाऊ हार्दिक माझ्याबरोबर सेटवर होता.
माझे बोलणे ऐकल्यानंतर खोलीत शांतता…
शाहरुख खान जेव्हा सेटवर आला, तेव्हा सगळे त्याच्याभोवती गोळा झाले. त्याच्याशी बोलत होते. तो सगळ्यांशी बोलत होता. मी आणि माझा भाऊ सगळ्यात मागे होतो. आम्ही एकमेकांशी बोलत होतो. मी माझ्या भावाला विचारले की, जर इथून जाण्याआधी शाहरुख माझ्याशी बोलण्यासाठी आला, तर मी त्याच्याशी काय बोलायला पाहिजे, असे तुला वाटते. त्यावर हार्दिक मला गमतीत म्हणाला की, तू तुझ्या हाताची नस काप. हे सगळं बोलताना आम्ही हसत होतो.
“मी ‘बेबी जॉन’ या चित्रपटाचा भाग असल्याने शाहरुख जाताना माझ्याशी बोलण्यासाठी आला. तो म्हणाला की, ठीक आहे, बाय. मी त्याला म्हणाले की, तुम्हाला भेटून मला आनंद झाला. माझ्या भावाने मला माझ्या हाताची नस कापण्याचा सल्ला दिला होता. पण, मी माझ्या हाताची नस कापणार नाही, असे मी शाहरुख खानला बोलले.
माझे बोलणे ऐकल्यानंतर खोलीत शांतता पसरली आणि शाहरुख निघून गेला. तो गेल्यानंतर प्रॉडक्शनमधील एक माणूस माझ्याकडे धावत आला आणि म्हणाला की, तू तुझ्या हाताची नस कापण्याबद्दल बोललीस का? हे ऐकताच मला व माझ्या भावाला आश्चर्य वाटले. कारण- मला प्रामाणिकपणे वाटले होते की, शाहरुखला विनोद समजेल; पण तो त्याला समजला नाही”, असे म्हणत शाहरुख खानबरोबरची पहिली भेट विचित्र होती, असे वामिका गब्बी म्हणाली.
याच मुलाखतीत राजकुमार रावनेदेखील शाहरुखच्या भेटीबद्दल सांगितले. त्यामध्ये राजकुमार रावने, “मी फराह खानच्या वाढदिवशी शाहरुखला भेटलो. आम्ही खूप गप्पा मारल्या. आम्ही त्यांच्या ‘किंग’ चित्रपटावर चर्चा केली. त्यानंतर आम्ही आर्यन खानच्या नवीन शोबद्दल बोललो. शाहरुख खानने माझ्या ‘स्त्री २’ चित्रपटाचे कौतुक केले”, अशी आठवण सांगितली.
दरम्यान, ‘जवान’चा दिग्दर्शक अॅटली हा ‘बेबी जॉन’ चित्रपटाचाही दिग्दर्शक आहे. या चित्रपटात वामिका गब्बी आणि राजकुमार राव प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत.