Mushtaq Khan Passes Away : ‘वेलकम’, ‘जोडी नंबर 1’ सारख्या बॉलीवूडच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन झालं आहे. ५६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुश्ताक खान हे गेल्या काही काळापासून लिव्हर कॅन्सरशी झुंज देत होते.

मुंबईतील नानावटी रुग्णालयात मुश्ताक खान यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पाच वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. अलीकडेच हा आजार पुन्हा बळावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बी. एन. तिवारी यांनी ‘स्क्रीन’शी बोलताना या दुःखद बातमीला दुजोरा दिला असून, त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांपासून आजारी होते मुश्ताक खान

बी. एन. तिवारी यांनी ‘स्क्रीन’शी बोलताना मुश्ताक खान यांच्या निधनाची बातमी दिली. “त्यांचे निधन अवघ्या एका तासापूर्वी झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय,” असं त्यांनी सांगितलं.

मुश्ताक खान यांच्या करिअरची सुरुवात

आपल्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंग आणि सहाय्यक भूमिकांसाठी लोकप्रिय असलेल्या मुश्ताक खान यांचा जन्म मध्य प्रदेशातील बैहर इथे झाला. अभिनयाची आवड असल्याने ते करिअर करण्यासाठी मुंबईत आले. त्यांनी १९८० च्या दशकात हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या असल्या, तरी त्यांना खरी ओळख आणि लोकप्रियता त्यांच्या कॉमेडी आणि सहाय्यक भूमिकांमुळे मिळाली.

mushtaq-khan-passes-away-welcome-actor-liver-cancer
अभिनेते मुश्ताक खान (फोटो- इन्स्टाग्राम)

वेलकम चित्रपटामुळे मिळाली ओळख

२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम’ चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली. या चित्रपटात त्यांनी मजेशीर अपंग माणसाची भूमिका साकारली होती. मुश्ताक खान यांचे या चित्रपटातील डायलॉग आजही मीम्सच्या रुपात व्हायरल होत असतात.

मुश्ताक खान यांचे चित्रपट

मुश्ताक खान यांनी वेलकम, वेलकम बॅक, सडक, दिल है की मानता नहीं, मोहरा, जोडी नं १, स्त्री, हे बेबी, प्यार तो होना ही था व रावण चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. त्यांनी ‘टेढे मेढे सपने’ आणि इतर काही मालिकांमध्ये काम केलं होतं.