वेलकम टू द जंगल हा सिनेमा २६ जून २०२६ ला प्रदर्शित झाला. अनेक महिन्यांपासून या सिनेमाची चर्चा सुरू होती. या सिनेमात बॉलीवूडमधील ३० हून अधिक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. अक्षय कुमार, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, दिशा पाटणी, राजपाल यादव, रवीना टंडन अशा अनेक लोकप्रिय कलाकारांनी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, इतकी मोठी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचे बजेट किती आहे, याबद्दल तुम्हाला माहीत आहे का?
सिनेमाच्या बजेटबद्दल अहमद खान काय म्हणाले?
या सिनेमाच्या बजेटबद्दल दिग्दर्शक अहमद खान यांनी खुलासा केला आहे. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत अहमद खान यांनी सिनेमाच्या बजेटबद्दल वक्तव्य केले आहे. अहमद खान म्हणाले, “या चित्रपटावर कलाकार, ॲक्शन, गाणी आणि इतर सर्व खर्च मिळून जास्तीत जास्त ११५ ते १२० कोटी रुपये खर्च झाले आहेत. फार तर हा खर्च १२५ कोटी रुपयांपर्यंत गेला असेल. त्यात व्याजाचाही खर्च धरला तरी बजेट त्या मर्यादेपलीकडे गेलेले नाही. डिजिटल, सॅटेलाइट, म्युझिक आणि परदेशातील वितरण हक्कांच्या माध्यमातून हा खर्च आधीच वसूल झाला आहे. यानंतर चित्रपट जेवढी कमाई करेल, तो सर्व नफा असेल आणि त्याचा संपूर्ण फायदा निर्मात्यांनाच होईल”, असे म्हणत अहमद खान यांनी चित्रपटाचे बजेट ११५ ते १२० कोटी इतके असल्याचा दावा केला.
याआधी अहमद खान यांनी बॉलीवूड हंगामला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणालेले, “चित्रपटाचे शूटिंग ७५ शिफ्टमध्ये पूर्ण झाले. प्रत्येक शिफ्ट ही ८ तासांची असे. त्यापैकी सहा ते साडेसहा तास शूटिंग केले जात असे. कारण इतर वेळ ब्रेकमध्ये जात असे.”
हॉलीवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अहमद खान म्हणालेले, “सेटवर ७०० ते ९०० लोक असायचे. याबरोबरच, मुख्य कलाकारांबरोबर प्रत्येक कलाकाराबरोबर त्यांची टीमही असे. साधारणपणे प्रत्येक कलाकारासोबत पाच जणांचा स्टाफ असे, त्यामुळे ३० कलाकार आणि त्यांच्या टीमचा विचार केला तर १५० लोक केवळ कलाकारांबरोबर असत. तसेच ५० व्हॅनिटी व्हॅन उभ्या करण्यासाठी आम्हाला दोन मोठी मैदाने शोधावी लागली.”
‘वेलकम टू द जंगल’ सिनेमात अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांच्याबरोबरच अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. तुषार कपूर, फताब शिवदासानी, परेश रावल, जॅकी श्रॉफ, अर्शद वारसी, जॅकलीन फर्नांडिस, उर्वशी रौतेला, कृष्णा अभिषेक, किरण कुमार, फरिदा जलाल, राजपाल यादव, पंकज धीर, यशपाल शर्मा, श्रेयस तळपदे, विंदू दारा सिंग, मिका सिंग, लारा दत्ता, किकू शारदा, जॉनी लिव्हर असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
दरम्यान, या चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे तर आतापर्यंत त्याने जगभरात १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
