Welcome To The Jungle Teaser Release : अक्षय कुमारच्या आगामी ‘वेल्कम टू द जंगल’ Welcome to the Jungle या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे.

प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता असण्यामागच्या कारणांपैकी एक म्हणजे या चित्रपटात ३०हून अधिक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार असून प्रेक्षकांना भरपूर कॉमेडी आणि मनोरंजनाचा तडका पाहायला मिळणार आहे. स्टारकास्टमुळे हा चित्रपट आधीपासूनच चर्चेत आहे.

अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या ‘वेल्कम टू द जंगल’ या चित्रपटात तब्बल ३०हून अधिक बॉलिवूड कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान यांनी केलं आहे. आज प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकारांची फौज पाहायला मिळतेय. टीझरमध्ये अक्षय कुमार त्याच्या खास विनोदी अंदाजात दिसत असून, त्याच्या भन्नाट विनोदाच्या टायमिंगमुळे तो प्रेक्षकांना खळखळून हसवणार असल्याचं दिसतं.

समोर आलेल्या टीझरमध्ये सुरुवातीलाच अक्षय कुमार चित्रपट बनवत असताना कोणत्याही प्राण्यांचा वापर किंवा त्यांना त्रास देण्यात आलेली नाही. शिवाय काही घोडे आणि आमच्यासारखे गाढव असं बोलताना दिसतो.तर पुढे अक्षय कुमार व सुनीर शेट्टी यांच्यातील विनोदी संवाद पाहायला मिळतो. टीझरमध्ये संपूर्ण जंगलातील सीन पाहायला मिळत आहेत.

अक्षय-रवीना २२ वर्षांनंतर झळकणार एकत्र

समोर आलेल्या टीझरमध्ये रवीना टंडन, दिशा पाटनी यांचीसुद्धा झलक पाहायला मिळतेय. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटातून तब्बल २२ वर्षांनंतर अक्षय व रवीना यांची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. या दोघांनी शेवटचं २००४ मध्ये आलेल्या ‘पोलीस फोर्स’ या चित्रपटात एकत्र काम केलेलं. एकूणच बॉलीवूडमधील अनेक कलाकार या चित्रपटातून प्रेक्षकांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. अक्षय कुमारने शेअर केलेल्या या टीझरखाली त्याच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत ते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

याशिवाय ‘वेल्कम टू द जंगल’ या चित्रपटात अक्षय कुमारसह अर्शद वारसी, सुनील शेट्टी, दिशा पाटनी, रवीना टंडन, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, जॉनी लिव्हर यांसारखे अनेक लोकप्रिय कलाकारही चित्रपटात कॉमेडीचा तडका लावताना दिसणार आहेत. २६ जून २०२६ मध्ये ‘वेल्कम टू द जंगल’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘वेल्कम’ आणि ‘वेल्कम बॅक’ या दोन चित्रपटांनंतर आता या फ्रँचायझीचा तिसरा भागसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.