Amitabh Bachchan reaction on Affair with Rekha : महानायक अमिताभ बच्चन यांच्या अनेक सुपरहिट चित्रपटांबरोबरच एकेकाळी त्यांच्या व रेखाच्या अफेअरची प्रचंड चर्चा झाली. त्यांनी एकत्र काम केलेला शेवटचा चित्रपट येऊन आणि त्यांचं नातं संपूनही अनेक दशकं लोटली असली तरी आजही त्यांची चर्चा होत असते. अमिताभ बच्चन यांनी एकदा या अफवांवर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी थेट पुरावे मागितले होते.
लेखिका भावना सोमाया यांनी ‘अमिताभ बच्चन: द लिजेंड’ (१९९९) या पुस्तकासाठी घेतलेल्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की, त्यांना “फ्लर्टचं लेबल लावलं जातं, त्याकडे किंवा रेखा यांच्याबरोबरच्या अफवांकडे दुर्लक्ष कसं करता?” असं विचारण्यता आलं होतं. त्यावर जोपर्यंत मीडिया कोणताही पुरावा सादर करत नाही, तोपर्यंत गप्प राहणंच पसंत असल्याचं अमिताभ बच्चन म्हणाले होते.
तुम्ही मला रेखाबरोबर किती वेळा पाहिलंय? अमिताभ बच्चन
“संबंधित महिलेबरोबर जर मी तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी दिसलो असेल आणि माझं तिच्याबरोबरचं वर्तन जर आक्षेपार्ह असेल, तर त्याचे पुरावे मला मला द्यावे. मी त्यावर योग्य ते बोलेन. पण केवळ तुम्ही बातमी छापता म्हणून त्यावर मी प्रतिक्रिया द्यावी ही अपेक्षा ठेवणं, जेणेकरून तुम्हाला आणखी चांगली बातमी लिहिता येईल, यासाठी कसलेही निराधार आरोप करू नका. सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वागणं तर दूरच, पण तुम्ही आम्हाला एकत्र किती वेळा पाहिलं आहे?” असा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी विचारला होता.

रेखाबरोबर दुसऱ्या बंगल्यात राहण्याच्या चर्चेबद्दल अमिताभ बच्चन म्हणालेले…
पुढे अमिताभ बच्चन म्हणालेले, “अलीकडेच, एका प्रतिष्ठित चित्रपट मॅगझिनने असा दावा केला होता की, मी माझ्या ‘प्रतीक्षा’ या दुसऱ्या बंगल्यात संबंधित महिलेबरोबर राहण्यासाठी गेलो आहे. अशा गोष्टी जेव्हा माझ्या बंगल्याच्या फोटोंसह छापून येतात, तेव्हा भोळे वाचक त्या बातम्यांना ठोस पुरावा मानतात. पण हे सगळं अत्यंत दिशाभूल करणारं आणि प्रतिमा मलिन करणारं असतं.” त्यावर स्पष्टीकरण देणं हे अपमानास्पद असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

या प्रकारच्या अफवा त्यांच्याच बाबतीत का पसरवल्या जातात, असा सवालही त्यांना विचारण्यात आला होता. “मला आश्चर्य वाटतं. माझ्याकडे सगळं काही आहे असा लोकांचा समज आहे, जरी प्रत्यक्षात तसं नसलं तरी? कदाचित म्हणून तर नाही ना. पण टीका करणाऱ्यांनी एक गोष्ट समजून घ्यावी की त्यांना जे वाटतं ती फक्त फँटसी आहे. मी काही गोष्टीत नशीबवान असलो तरी अनेक गोष्टीत कमनशिबी आहे,” असं अमिताभ बच्चन म्हणाले होते.

रेखा व अमिताभ बच्चन यांचे चित्रपट
अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी १९७० आणि १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला ‘दो अंजाने’ (१९७६), ‘अलाप’ (१९७७), ‘खून पसीना’ (१९७७), ‘गंगा की सौगंध’ (१९७८), ‘मुद्दर का सिकंदर’ (१९७८), ‘मिस्टर नटवरलाल’ (१९७९), ‘सुहाग’ (१९७९), ‘राम बलराम’ (१९८०) आणि ‘सिलसिला’ (१९८१) असे अनेक सुपरहिट चित्रपट एकत्र केले. पण नंतर ते कधीच एकत्र दिसले नाही.
