ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र त्यांची प्रकृती बिघडल्याने चर्चेत आहेत. ८९ व्या वर्षीही सिनेसृष्टीत सक्रिय असलेल्या धर्मेंद्र यांनी एकेकाळी राजकारण नशीब आजमावलं होतं. खरं तर धर्मेंद्र यांच्यासह कुटुंबातील आणखी दोन सदस्यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले होते.
धर्मेंद्र यांच्या कुटुंबाचा राजकारणातही मोठा इतिहास राहिला आहे. हेमा मालिनी यांची राजकीय कारकीर्द २००३ मध्ये सुरू झाली. तर सनी देओलने २०१९ मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण धर्मेंद्र यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
कोणत्या मतदारसंघाचे खासदार होते धर्मेंद्र?
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत धर्मेंद्र यांनी राजस्थानमधील बिकानेर येथून निवडणूक लढवली होती. महत्त्वाचं म्हणजे ते विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या रामेश्वर लाल दुडी यांचा पराभव केला. धर्मेंद्र यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून जवळजवळ ६०,००० मतांनी विजय मिळवला होता. संपूर्ण देओल कुटुंबीय आणि हेमा मालिनी यांनी त्यांच्यासाठी प्रचार केला होता. पण धर्मेंद्र यांची राजकीय कारकीर्द फार लहान होती. अवघ्या पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर त्यांनी राजकारण कायमचे सोडले.
धर्मेंद्र यांनी स्वतः सांगितलं होतं की त्यांना राजकारण आवडत नाही. त्यांना त्यांच्या फिल्मी करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं. राजकारण आपल्यासाठी योग्य नसल्याचं धर्मेंद्र यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. तसेच खासदार असताना बिकानेरच्या लोकांच्या कल्याणासाठी खूप काम केले होते, पण त्याचे श्रेय इतरांनी घेतले होते, असा दावा धर्मेंद्र यांनी केला होता.
हेमा मालिनी मथुरेच्या खासदार
धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी राजकारण सक्रिय आहेत. २००३ मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून हेमा मालिनींनी त्यांच्या राजकारणातील कारकिर्दीला सुरुवात केली. २००४ ते २००९ पर्यंत त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. २०१४ मध्ये त्यांनी मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकल्या. तेव्हापासून, त्यानंतर २०१९ मध्ये त्या निवडणूक जिंकल्या आणि २०२४ मध्ये तिसऱ्यांदा विजयी झाल्या. मागील ११ वर्षांपासून हेमा मालिनी मथुरेच्या खासदार आहेत.
सनी देओलनेही लढवली होती निवडणूक
सनी देओलचा राजकीय प्रवास फार खास राहिला नाही. २०१९ मध्ये सनी देओललने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्याने काँग्रेसचे सुनील जाखड यांचा ८२,४५९ मतांनी पराभव केला होता. लोकांनी मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिलं, पण सनी राजकारणात फारसा सक्रिय राहिला नाही. २०१९ मध्ये गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघ जिंकल्यानंतर, त्याने २०२४ मध्ये पुन्हा निवडणूक लढवण्यास नकार दिला.
