When Dharmendra drunk-dialed Hrishikesh Mukherjee: बॉलीवूडच्या दिग्गज दिग्दर्शकांमध्ये हृषिकेश मुखर्जी यांचे नाव घेतले जाते. त्यांनीच अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना या दोन लोकप्रिय कलाकारांना एकत्र आणण्याचे काम केले होते. अमिताभ बच्चन व हृषिकेश मुखर्जी या दिग्दर्शक-अभिनेत्याची जोडी प्रचंड गाजली, यशस्वी ठरली. अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच त्यांनी धर्मेंद्र, राजेश खन्ना, ऋषी कपूर अशा अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे.

हृषिकेश मुखर्जींच्या सिनेमात अमिताभ बच्चन आणि राजेश खन्नांनी केलेले एकत्र काम

हृषिकेश मुखर्जी यांचा जन्म ३० सप्टेंबर १९२२ रोजी कोलकातामध्ये झाला. आज त्यांची १०४ वी जयंती आहे. या ज्येष्ठ चित्रपट निर्मात्याने कोलकाता विद्यापीठातून पदवी मिळवली. नंतर त्यांनी एका शाळेत गणित आणि विज्ञानाचे शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी बॉलीवूडमध्ये कॅमेरामॅन म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कोलकाता येथील एका थिएटरमध्ये फिल्म एडिटर म्हणून काम केले. मग ते कामाच्या शोधात मुंबईला गेले आणि तिथे त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या टीमबरोबर एडिटर म्हणून काम केले.

‘मुसाफिर’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात किशोर कुमार, दिलीप कुमार, निरुपा रॉय व दुर्गा खोटे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अनारी हा त्यांनी दिग्दर्शित केलेला दुसरा सिनेमा होता. १९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात राज कपूर, नूतन व ललिता पवार यांसारख्या दिग्गज कलाकारांनी काम केले. या सिनेमाने पाच फिल्मफेअर पुरस्कार जिंकले.

दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांनी एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये हृषिकेश मुखर्जी आणि त्यांचा एक मजेशीर किस्सा सांगितला होता. ते म्हणालेले की ऋषीदा यांनी मला त्यांच्या ‘आनंद’ या चित्रपटाची गोष्ट ऐकवली होती. मला त्या सिनेमात भूमिका देण्याचा विचार असल्याचे त्यांनी मला सांगितले होते. पण, त्यानंतर मला समजले की, त्या सिनेमात राजेश खन्ना दिसणार आहेत. मला वाईट वाटले. त्यानंतर मी दारूच्या नशेत रात्री त्यांना फोन केला. मी रात्रभर त्यांना फोन करुत होतो. मी त्यांना विचारले की, तुम्ही असं कसं काय करू शकता? ते मला म्हणाले की, आपण यावर शांतपणे चर्चा करू. पण, मी मात्र सतत त्यांना फोन करून तेच विचारत होतो.

आनंद या सिनेमात राजेश खन्ना प्रमुख भूमिकेत होते. त्यावेळी राजेश खन्ना सुपरस्टार होते. असे म्हटले जाते की, त्यावेळी राजेश खन्ना एका चित्रपटासाठी आठ लाख रुपयांपर्यंत मानधन घेत असत. मात्र, हृषिकेश मुखर्जी यांच्यासाठी त्यांनी मानधनाच्या रकमेतील सात लाख रुपये कमी केले. म्हणजे त्यांनी ‘आनंद’साठी केवळ एक लाख रुपये इतकेच मानधन घेतले. या चित्रपटात अमिताभ बच्चनदेखील होते. या दोन लोकप्रिय कलाकारांनी या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र काम केले.

हृषिकेश मुखर्जी यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत एकापेक्षा एक सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. अनारी, आनंद, अभिमान, गुड्डी, बावर्ची, असे त्यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे गाजले. २००६ मध्ये त्यांचे मुंबईत निधन झाले.