Dharmendra Hema Malini: अभिनेत्री हेमा मालिनी व अभिनेते धर्मेंद्र यांनी १९८० मध्ये प्रेमविवाह केला. दोघांच्या लग्नामुळे बराच वाद झाला होता. कारण धर्मेंद्र आधीच विवाहित होते. त्यांचं लग्न प्रकाश कौरशी झालं होतं आणि त्यांना सनी, बॉबी, अजिता आणि विजया ही चार अपत्ये होती. त्यामुळे विवाहित असूनही धर्मेंद्र यांनी दुसरे लग्न कसे केले याबाबत जाणून घेण्याची लोकांना खूप उत्सुकता होती. लग्न करण्यासाठी धर्मेंद्र व हेमा यांनी धर्मांतर केले, दोघांनी इस्लाम धर्म स्वीकारून आधी निकाह केला आणि मग पारंपरिक अय्यंगार पद्धतीने लग्न केलं, अशा अफवा पसरल्या होत्या.
राम कमल मुखर्जी यांनी हेमा मालिनी यांच्यावर ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यानुसार, हिंदू विवाह कायद्यांतर्गत धर्मेंद्र आणि हेमा यांचे लग्न बेकायदेशीर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. कारण धर्मेंद्र आधीच विवाहित होते. या पुस्तकात म्हटलंय की दोघांनी इस्लाम स्वीकारला, त्यांची नावे बदलून दिलावर आणि आयशा बी अशी ठेवली आणि १९७९ मध्ये निकाह केला, या गोष्टी बोलल्या जात होत्या. २००४ मध्ये धर्मेंद्र लोकसभा निवडणूक लढवत होते, तेव्हा पुन्हा एकदा या अफवांनी जोर धरला होता. कारण धर्मेंद्र यांनी प्रतिज्ञापत्रात फक्त पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्या संपत्तीची माहिती दिली होती, हेमा मालिनी यांचा उल्लेख कुठेच नव्हता, हा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला होता.
हेही वाचा – पृथ्वीक प्रतापच्या पत्नीचे नाव काय? दोघांचे लग्नाआधीचे फोटो पाहिलेत का?
राजकीय गदारोळ अन् हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया
हेमा मालिनी यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली होती. धर्मेंद्र यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांचं नाव का टाकलं नाही, याबद्दल त्या म्हणाल्या होत्या, “ही आमच्या दोघांमधील अत्यंत खासगी बाब आहे आणि आम्ही ती आपापसात सोडवू. इतर कोणीही याची काळजी करण्याची गरज नाही.” त्यावेळी हेमा या राज्यसभेच्या सदस्य होत्या. नाव आणि धर्माबद्दल चुकीची माहिती दिल्याने हेमा यांचे नॉमिनेशन रद्द करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने केली होती. “या आरोपांमध्ये तथ्य नाही. याविषयी मला आणखी काही बोलायचं नाही,” असं हेमा म्हणाल्या होत्या. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.
हेही वाचा – कपूर कुटुंबातील पहिला पण विस्मृतीत गेलेला स्टार, दिले होते अनेक हिट सिनेमे
धर्मेंद्र काय म्हणाले होते?
या पुस्तकात धर्मेंद्र यांचीही बाजू मांडण्यात आली होती. धर्मेंद्र यांनी कधीच धर्म बदलला नाही, असं म्हटलं होतं. “हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मी असा माणूस नाही जो आपल्या आवडीनुसार धर्म बदलेल”, असं धर्मेंद्र २००४ मध्ये आउटलुकशी बोलताना म्हणाले होते. पुस्तकात हा उल्लेख आहे.
हेही वाचा…क्रिकेटपटू व्हायचं स्वप्न, पण झाला अभिनेता, वडिलांनी बॅटने दिलेला चोप; स्वतःच केला खुलासा
धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले, मात्र पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट दिला नाही. त्यांना पहिल्या लग्नापासून चार अपत्ये आहेत. तर हेमा मालिनी व धर्मेंद्र यांना ईशा देओल व आहाना देओल या दोन मुली आहेत.