Dharmendra Hema Malini Wedding Controversy: दिवंगत अभिनेते धर्मेंद्र व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी १९८० साली प्रेमविवाह केला होता. धर्मेंद्र आधीच विवाहित व चार मुलांचे वडील होते, त्यामुळे दुसऱ्या लग्नामुळे ते टीकेचे धनी ठरले होते. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौरशी झालं होतं. त्यांना सनी, बॉबी, अजिता आणि विजया ही चार अपत्ये होती. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनींशी दुसरं लग्न केलं होतं. त्यामुळे दुसरं लग्न करण्यासाठी धर्मेंद्र व हेमा यांनी धर्मांतर केले होते, दोघांनी इस्लाम धर्म स्वीकारून आधी निकाह केला आणि मग पारंपरिक अय्यंगार पद्धतीने लग्न केलं, अशा अफवा पसरल्या होत्या.
राम कमल मुखर्जी यांनी हेमा मालिनी यांच्यावर ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यानुसार, हिंदू विवाह कायद्यांतर्गत धर्मेंद्र आणि हेमा यांचे लग्न बेकायदेशीर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. कारण धर्मेंद्र आधीच विवाहित होते. दोघांनी इस्लाम स्वीकारला, त्यांची नावे बदलून दिलावर आणि आयशाबी अशी ठेवली आणि १९७९ मध्ये निकाह केला, अशा चर्चा सुरू होत्या, असं पुस्तकात लिहिलंय. २००४ मध्ये धर्मेंद्र लोकसभा निवडणूक लढवत होते, तेव्हा पुन्हा एकदा या अफवांनी जोर धरला होता. कारण धर्मेंद्र यांनी प्रतिज्ञापत्रात फक्त पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्या संपत्तीची माहिती दिली होती, हेमा मालिनी यांचा उल्लेख कुठेच नव्हता, हा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला होता.
हेमा मालिनींनी दिलेली प्रतिक्रिया
धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नाबाबत मोठ्या प्रमाणात अफवा पसरत होत्या. वादाला तोंड फुटल्यावर हेमा मालिनी प्रतिक्रिया दिली होती. धर्मेंद्र यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांचं नाव का टाकलं नाही, याबद्दल त्या म्हणाल्या होत्या, “ही आमच्या दोघांमधील अत्यंत खासगी बाब आहे आणि आम्ही ती आपापसात सोडवू. इतर कोणीही याची काळजी करण्याची गरज नाही.” हे सगळं घडलं तेव्हा हेमा या राज्यसभेच्या सदस्य होत्या. नाव आणि धर्माबद्दल चुकीची माहिती दिल्याने हेमा यांचे नॉमिनेशन रद्द करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने केली होती. “या आरोपांमध्ये तथ्य नाही. याविषयी मला आणखी काही बोलायचं नाही,” असं हेमा म्हणाल्या होत्या. इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
धर्मेंद्र धर्मांतराबद्दल काय म्हणाले होते?
या पुस्तकात धर्मेंद्र यांचीही बाजू मांडण्यात आली होती. धर्मेंद्र यांनी कधीच धर्म बदलला नाही, असं म्हटलं होतं. “हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मी असा माणूस नाही जो धर्म बदलेल”, असं धर्मेंद्र २००४ मध्ये आउटलुकशी बोलताना म्हणाले होते. पुस्तकात हा उल्लेख आहे.
धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न नक्कीच केलं. पण त्यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट दिला नाही. धर्मेंद्र यांची दोन्ही कुटुंबे कायम वेगळी राहिली. हेमा मालिनी लग्नानंतर कधीच धर्मेंद्र यांच्या घरी गेल्या नव्हत्या. त्या जुहू येथील त्यांच्या बंगल्यात स्वतंत्र राहिल्या.
