कौटुंबिक पार्श्वभूमी सिनेसृष्टीची असेल तर या क्षेत्रात येणाऱ्या कलाकारांना संधी मिळत असल्या तरी स्वतःला वेळोवेळी सिद्ध करावं लागतं. कारण त्यांची तुलना कुटुंबातील यशस्वी कलाकारांशी होत असते. आज अशाच एका अभिनेत्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या अभिनेत्याच्या कुटुंबातील ३ जण मोठे बॉलीवूड स्टार राहिलेत. पण त्याला त्या तिघांइतकं यश मिळालं नाही. हा अभिनेता म्हणजे अभय देओल होय.
‘हीमॅन’ धर्मेंद्र यांचे धाकटे भाऊ अजित देओल यांचा मुलगा, सनी व बॉबी देओलचा चुलत भाऊ अभयने आपल्या चुलत भावांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत प्रवेश केला. देओल कुटुंबातील इतर अभिनेते अॅक्शन आणि दमदार डायलॉग्ससाठी ओळखले जातात. पण अभयने स्वतःसाठी एक वेगळी वाट निवडली. त्याने २००५ मध्ये इम्तियाज अली यांच्या ‘सोचा ना था’ या चित्रपटातून पदार्पण केले.
अभय देओलने स्टारडमपेक्षा स्क्रिप्टला महत्त्व दिलं
मुंबईत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभयने न्यूयॉर्कमधील ‘द न्यू स्कूल’मधून आर्ट आणि थिएटरचे शिक्षण घेतले होते. त्याला अभिनयाची जाण होती, म्हणूनच त्याने स्टारडमपेक्षा स्क्रिप्टला महत्त्व दिलं. त्यामुळे त्याच्या अभिनयाचं समीक्षकांकडून कायम कौतुक झालं.
ती भूमिका अन् दारूचं व्यसन
‘सोचा ना था’मधून करिअरची सुरुवात केल्यावर त्याने ‘मनोरमा सिक्स फीट अंडर’ सिनेमात काम केलं. यात त्याची भूमिका गंभीर होती. तर ‘ओये लकी लकी ओये’ या चित्रपटात त्याची भूमिका हटके होती. अनुराग कश्यपच्या देव डी चित्रपटाने अभयच्या करिअरला मोठी कलाटणी दिली. या चित्रपटातील त्याची भूमिका खूपच वास्तववादी होती. या चित्रपटामुळे तो इंडस्ट्रीतील आघाडीच्या कलाकारांमध्ये सामील झाला. ‘देव डी’ मधील भूमिकेचा अभयवर इतका खोल परिणाम झाला होता की, त्याला दारूचं व्यसन जडलं होतं. तो वर्षभर दारूची नशा करत होता. यातून सावरण्यासाठी त्याला बराच वेळ लागला.
अभयने लहानपणाच्या आठवणी एकदा एका मुलाखतीत सांगितल्या होत्या. अभय खूप खोडकर होता. एकदा गाडी वेगाने चालवल्यामुळे धर्मेंद्र यांनी त्याला कानशिलातही लगावली होती.
दरम्यान, अभय देओलला मोठ्या पडद्यावर व्यावसायिक यश फारसं मिळालं नाही, पण तो अतिशय यशस्वी उद्योजक आहे. रेस्टॉरंट्स, प्रोडक्शन हाऊस आणि रिअल इस्टेटच्या माध्यमातून त्याने सुमारे ४०० कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले आहे. ५० वर्षांचा अभय अविवाहित आहे.
