भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री नर्गिस यांची आज जयंती आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ज्यात 'मदर इंडिया', 'श्री ४२०', 'चोरी-चोरी', 'अंदाज', 'आवारा', 'बरसात', 'आग' यांचा समावेश आहे. त्यांनी जवळपास तीन दशकं हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. अभिनेत्री नर्गिस जितक्या सुंदर होत्या, तितकाच अप्रतिम त्यांचा अभिनय होता. नर्गिस यांचा जन्म १ जून १९२९ रोजी कोलकाता इथं झाला. त्यांचे वडील मोहन चंद उत्तम चंद म्हणजेच मोहन बाबू होते परंतु त्यांनी इस्लाम स्वीकारला आणि अब्दुल राशीद झाले. नर्गिस यांचं खरं नाव फातिमा राशीद होतं. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट ‘तलाश-ए-हक’ होता. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दलचे काही किस्से जाणून घेऊयात. हेही वाचा - अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभबद्दल माहितीये का? बिग बींच्या मैत्रिणीशीच केलंय लग्न; जाणून घ्या कुठे राहतं कुटुंब सुनील दत्त आणि नर्गिस यांची पहिली भेट रेडिओ ऑफिसमध्ये झाली होती, खरं तर नर्गिस त्यावेळी सिनेसृष्टीतील लोकप्रिय होत्या. पण सुनील दत्त सिलोन रेडिओमध्ये रेडिओ जॉकी म्हणून काम करायचे आणि त्यांना नर्गिसची मुलाखत घेण्यास सांगण्यात आले. नर्गिस वेळेआधीच स्टुडिओत पोहोचल्या. मुलाखत सुरू होताच सुनील दत्त नर्गिसला पाहून इतके घाबरले की त्यांना प्रश्नच विचारू शकले नाही. या कारणामुळे त्यांची नोकरी गेली असती. सुनील दत्त आणि नर्गिसची दुसरी भेट 'दो बिघा जमीन' चित्रपटाच्या सेटवर झाली. पण त्यांच्या प्रेमाची सुरुवात 'मदर इंडिया'च्या सेटवर झाली. नर्गिस आणि सुनील दत्त यांनी मार्च १९५८ मध्ये गुपचूप लग्न केलं होतं, पण त्यांनी १९५९ मध्ये त्याबद्दल सर्वांना सांगितलं होतं, असं म्हटलं जातं. लग्नानंतर नर्गिस यांनी चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं. २५ लाखांसाठी दोन प्रश्न अन् तीन लाइफलाइन; तरीही ‘कोण होणार करोडपती’च्या स्पर्धकाने सोडला खेळ; तुम्हाला माहितीये का उत्तर? नर्गिस कर्करोगाने ग्रस्त होत्या. त्याचे निदान आणि उपचार न्यूयॉर्कमध्ये करण्यात आले. नंतर त्या भारतात परतल्या व त्यांची प्रकृती खालावली आणि त्या कोमात गेल्या. मग, डॉक्टरांनी सुनील दत्तना सांगितलं होतं की, 'नर्गिस यांना शांतपणे मरू द्या. नर्गिस अनेक महिन्यांपासून कोमात आहेत आणि त्या वाचल्या तरी त्या फक्त पडून राहतील.' डॉक्टरांनी सांगितलं ते ऐकल्यावर सुनील दत्त यांनी नर्गिस यांना मरू देण्यास नकार दिला. त्यानंतर त्या कोमातून बाहेर आल्या, पण कर्करोगावर मात करू शकल्या नाही. मुलगा संजय दत्तचा डेब्यू चित्रपट 'रॉकी'च्या प्रीमियरला त्यांना यायचं होतं, त्यासाठी सुनील दत्त यांनी रुग्णवाहिका, स्ट्रेचर आणि व्हीलचेअरची व्यवस्था केली होती. पण नर्गिस त्यासाठी कधीच पोहोचू शकल्या नाहीत. ३ मे १९८१ रोजी त्यांचं निधन झालं.