‘बागबान’ हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. विशेष करून मध्यमवर्गीय कुटुंबात आवडीने पाहिल्या जाणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांनी राज मल्होत्रा व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी पूजा मल्होत्रा या भूमिका साकारल्या होत्या. यातील त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. पण, अनेकांना याबाबत माहिती नसेल की ‘बागबान’ चित्रपटासाठी हेमा मालिनी यांनी आधी नकार दिला होता. ‘बागबान’मधील भूमिका करण्यामागे एक किस्सा आहे. हेमा यांनी स्वत: ‘लेहरें रेट्रो’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं होतं.
हेमा मालिनी म्हणाल्या, “रवी चोप्रा माझ्या घरी चित्रपटाची कथा सांगण्यासाठी आले होते, तेव्हा माझी आईसुद्धा माझ्याबरोबर तिथे होती. त्यामुळे रवी चोप्रा सांगत असलेली कथा ती सुद्धा ऐकत होती. रवी चोप्रा गेल्यानंतर मी म्हटलं चार मोठ्या मुलांच्या आईच्या भूमिकेसाठी विचारतोय, मी कसं करू शकते. यावर माझी आई म्हणाली, नाही, उलट तू हा चित्रपट करायला हवा. मी म्हटलं पण का? तर ती म्हणाली, चित्रपटाची कथा खूप चांगली आहे, त्यामुळे तू ही भूमिका केलीच पाहिजे आणि तिने या चित्रपटासाठी माझ्याकडे आग्रह धरला, त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, मी करेन.”
हेमा मालिनी पुढे म्हणाल्या, “मी या चित्रपटासाठी नाही म्हणत होते, कारण मी यापूर्वी बराच काळ फार चित्रपट केले नव्हते. मोठ्या ब्रेकनंतर मी काम करणार होते, त्यामुळे मला वाटलं की मी अशी भूमिका का करू; पण आई म्हणाली तू हा चित्रपट केला पाहिजे, यातील भूमिका खूप चांगली असेल.” महत्त्वाचं म्हणजे फक्त हेमा मालिनी यांनाच नाही तर त्यांच्याआधी अभिनेत्री तब्बूलाही याच भूमिकेसाठी विचारणा झाली होती. परंतु, तब्बूनेही चित्रपटाची कथा छान आहे, पण वयाच्या ३६व्या वर्षी चार मुलांच्या आईची भूमिका करण्याची इच्छा नाही असं म्हटलं होतं.
‘बागबान’ चित्रपटाबद्दलची अजून एक गोष्ट म्हणजे, या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी राज मल्होत्रा ही भूमिका साकारली होती. परंतु, या भूमिकेसाठीसुद्धा त्यांच्या आधी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना विचारणा झाली होती. परंतु, त्यांनी काही हा चित्रपट केला नाही आणि शेवटी ही भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली. हेमा मालिनी व अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘बागबान’मध्ये अमिताभ बच्चन व हेमा मालिनी यांच्यासह सलमान खान, समीर सोनी, अमन वर्मा, नासिर खान, साहिल चड्डा, दिव्या दत्ता यांसारखे कलाकार झळकले होते.