‘किंग खान’, ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमॅन्स’ अशा विविध नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणून शाहरुख खानला ओळखले जाते. शाहरुख खान हा सध्या त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचताना दिसत आहे. नुकतंच एका मुलाखतीत शाहरुख खानने त्याला दु:ख झाल्यावर तो काय करतो? याबद्दलचा खुलासा केला आहे.
शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या बक्कळ कमाई करत आहे. चार वर्षांनंतर शाहरुखने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर तुफान गर्दी केली. तर त्याच्या चाहत्यांनी चित्रपट प्रदर्शित होताच मोठा आनंद साजरा केला. यानिमित्ताने शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम यांनी ‘आजतक’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी बऱ्याच गोष्टींबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “बाबा हे…”, ‘पठाण’ पाहिल्यानंतर शाहरुखचा लेक अबरामने दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया
या मुलाखतीत शाहरुख खानला ‘जेव्हा तुला दु:ख होते, तेव्हा तू काय करतो? तुला चाहत्यांचे इतके प्रेम मिळते, याबद्दल तुझ्या भावना काय असतात?’ असे प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी तो म्हणाला, “जेव्हा कधी माझा चित्रपट हिट होतो आणि जेव्हा कधी एखादा चित्रपट हिट होत नाही तेव्हाही ते मला तितकंच प्रेम देतात. मी हे अगदीच खरं सांगतोय.”
“मला माझ्या कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी एक सल्ला दिला होता, ते म्हणाले होते की जेव्हा तुम्हाला कधी दु:ख होईल तेव्हा त्यांच्याकडे जा, जे तुम्हाला प्रेम देतात. जेव्हा तुमचे एखादे काम होत नाही, तुम्हाला वाईट वाटत असेल, काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर तुम्ही जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्याकडे जा. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले वाईट दिवस येतात. अशावेळी तुम्ही ज्यांच्या बरोबर काम करता, तुम्हाला जे सल्ले देतात अशा लोकांकडे जाण्यापेक्षा तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांकडे जा.
माझे नशीब फार चांगले आहे की माझ्याकडे लाखो, करोडो, मिलीयन, बिलीयन लोक आहेत जे माझ्यावर प्रेम करतात. त्यामुळे जेव्हा मला दु:ख होते तेव्हा मी माझ्या बाल्कनीत येतो आणि जेव्हा मला आनंद वाटतो तेव्हाही मी माझ्या बाल्कनीत येतो. यातील विशेष बाब म्हणजे माझ्यावर देवाची इतकी कृपा आहे की त्याने मला कायमच बाल्कनीची तिकीट दिली आहे”, असेही शाहरुखने यावेळी म्हटले.
आणखी वाचा : “बारीक असणाऱ्या अभिनेत्री…” बॉडी शेमिंगच्या मुद्द्यावर निर्मिती सावंत यांनी मांडलेले स्पष्ट मत
दरम्यान ‘पठाण’ हिंदीसह तमिळ, तेलुगू भाषेमध्येही प्रदर्शित करण्यात आला. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात ५५० कोटींची कमाई केली आहे. पठाण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक ओपनिंग करणारा ठरला आहे. या चित्रपटाने ‘केजीएफ’ आणि ‘बाहुबली’, ‘वॉर’सारख्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.