Dilip Kumar and Kamini Kaushal: ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे ९८ व्या वर्षी निधन झाले. कामिनी कौशल यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अनेक चित्रपटांत काम केले.
कामिनी कौशल यांची भूमिका असलेले अनेक चित्रपट गाजले. त्यांचे दिलीप कुमार यांच्याबरोबरचे चित्रपट प्रचंड गाजले. त्यांच्या ऑनस्क्रीन जोडीला जितकी लोकप्रियता मिळाली, तितकेच त्यांचे ऑफस्क्रीन नातेदेखील चर्चेचा विषय होते.
कामिनी यांच्या बहिणीचे अकस्मात निधन झाले, त्यामुळे बहिणीच्या मुलींचा नीट सांभाळ केला जावा, यासाठी त्यांनी त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर बी.एस. सूद यांच्याशी १९४८ला लग्न केले.
“याची मला भीती वाटत…”
त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांनी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केले होते. त्या म्हणालेल्या, “माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम होते. माझ्या बहिणीचे निधन झाले तेव्हा तिच्या मुली फक्त दोन आणि तीन वर्षांच्या होत्या. त्यांचे आईविना कसे होईल याची मला भीती वाटत होती, त्यामुळे त्या परिस्थितीत तो चांगला उपाय असल्याचे मला वाटले.”
१९४८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शहीद’ चित्रपटात त्या प्रमुख भूमिकेत होत्या. या चित्रपटात त्यांचे सहकलाकार दिलीप कुमार होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांनी लग्न करण्याबद्दल विचारही केला. पण, परिस्थितीमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. त्या दिलीप कुमार यांच्या पहिल्या प्रेयसी होत्या.
याबद्दल कामिनी यांनी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केले होते. त्या म्हणालेल्या, “आम्ही वेगळे झाल्यानंतर आम्ही दु:खात बुडालो होतो. आम्ही एकमेकांबरोबर खूप आनंदी होतो. आमचे खूप चांगले नाते होते. पण, ते नाते संपवावे लागले. हेच आयुष्य आहे. मी माझ्या नवऱ्याला किंवा मुलींना हे म्हणू शकत नव्हते की मी लग्न मोडून जात आहे. माझा पती चांगला माणूस होता. हे सर्व का घडले, हे त्याने समजून घेतले. सगळेच कधी ना कधी प्रेमात पडतात.”
याच मुलाखतीत कामिनी यांनी आणखी एक प्रसंग सांगितला होता. त्या म्हणालेल्या, “खूप वर्षांनंतर मी दिलीप कुमार यांना पाहिले. त्यांनी मला पाहिले, पण त्यांनी मला ओळखले नाही. ते कोणालासु्द्धा ओळखत नव्हते. मला खूप वाईट वाटले. आम्ही एक काळ एकत्र जगला होता.”
दरम्यान, कामिनी कौशल यांनी ‘पूरब’, ‘रोटी, कपडा और मकान’, ‘जिद्दी’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
