Amitabh Bachchan Screen Awards Video : येत्या ५ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत होणाऱ्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’च्या निमित्ताने काही जुने किस्से आणि मजेशीर प्रसंग चर्चेत आहेत. असाच एक मजेशीर प्रसंग २०१६ मधील पुरस्कार सोहळ्यात झाल्याचा पहायला मिळाला होता. नेमकं काय घडलेलं? चला पाहूया…
२०१६ च्या स्क्रीन अवॉर्ड्सचे सूत्रसंचालन कपिल शर्मा आणि करण जोहर करत होते. त्यावेळी कपिलने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्याकडे जात रणवीरला खोडकरपणे विचारलं होतं की, “जास्त नखरे कोण करतात? मुलं की मुली?” त्यावर रणवीर हसत म्हणाला होता, “नक्कीच मुली.” लगेच कपिलने टोमणा मारत विचारलं, “नक्की कसले नखरे? विचार करून बोल, कारण तुझ्या उत्तराचा संबंध थेट दीपिकाशी असू शकतो.” यावर रणवीर कपिलला म्हणाला होता, “मुली तयार होताना खूप वेळ लावतात. तुझ्या एवढ्या मैत्रिणी आहेत म्हटल्यावर तुला हे चांगलंच ठाऊक असेल.”
यानंतर कपिलने हाच प्रश्न दीपिकाला विचारला होता. “तुला रणवीरचं म्हणणं पटतं का?” त्यावर दीपिका लगेच म्हणाली होते की, “अजिबात नाही.” यावर कपिल म्हणालेला, “म्हणजे मुली नखरे करत नाहीत?” त्यावर दीपिका म्हणाली होती, “करतात.. पण मुलं जास्त नखरे करतात.” यावर कपिल म्हणालेला, “ यानंतर दीपिकाने बाजूला बसलेल्या अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याकडे बोट दाखवत कपिलला म्हटलं होतं की, “हाच प्रश्न यांना (अमिताभ बच्चन व जया बच्चन) विचारला तर कदाचित योग्य उत्तर मिळेल.”
पुढे कपिलने अमिताभ बच्चन यांना विचारलं होतं की, “सर, तुमच्या घरी कुणाचं चालतं?” तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्याला जवळ बोलावले. त्यावर कपिल गमतीने म्हणाला होता की, “सर, तुमचा आवाज इतका भारदस्त आहे की, तुम्ही ‘जवळ ये’ म्हटलं तरी मला जेलमध्ये जाण्याची आज्ञा दिल्यासारखं वाटतंय.”
शेवटी अमिताभ बच्चन यांनी भन्नाट उत्तर दिलं की, “माझ्या घरी तर तुमचंच चालतं.” त्यावर कपिलने लगेच हजरजबाबीपणे उत्तर दिलं होतं. “सर, तुमच्या या वक्तव्यामुळे माझी फीच वाढणार आहे.” असं तो म्हणाला होता. त्याच्या या उत्तरावर उपस्थितांमध्येही एकच हशा पिकला होता.
