Kareena Kapoor Bipasha Basu Fight: बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींमधील वाद नवीन नाहीत, पण करीना कपूर आणि बिपाशा बासू यांच्यातील ‘अजनबी’ (२००१) चित्रपटाच्या सेटवर झालेली भांडणाची चर्चा आजही चित्रपटसृष्टीत होत असते. करीनाने बिपाशाला ‘काली बिल्ली’ (काळी मांजर) म्हणत कानशिलात लगावली होती, अशा चर्चांनी त्याकाळी खळबळ उडवून दिली होती. डिझायनर विक्रम फडणीसवरून पेटलेल्या या वादावर अमिता नांगिया आणि बिपाशा बासूने उघडपणे भाष्य केले होते.

बिपाशा बासूने २००१ मध्ये आलेल्या ‘अजनबी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात करीना कपूरदेखील मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोन्ही अभिनेत्रींमध्ये जोरदार भांडण झालं होतं. वाद इतका वाढला होता की करीनाने बिपाशाच्या कानशिलात लगावली आणि तिला ‘काली बिल्ली’ (काळी मांजर) म्हटलं होतं. दोघींपैकी कोणीही याबाबत जाहीरपणे बोललं नाही, पण त्यांच्या वादाची चर्चा मात्र आजही होते.

अमिता नांगियाने सेटवर काय पाहिलं होतं?

करीना आणि बिपाशा यांचं अजिबात पटायचं नाही. करीनाला न सांगता बिपाशाने तिचा डिझायनर विक्रम फडणीसबरोबर काम केलं, त्यानंतर दोघींमध्ये चांगलंच बिनसलं. या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री अमिता नांगिया हिने एकदा सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. “मला वाटतं की त्यांचा वाद कपड्यांशी संबंधित होता. त्या दोघांनाही तोच डिझायनर हवा होता,” असं तिने म्हटलं होतं. या भांडणाचा सेटवरील इतरांवर काही परिणाम झाला का, असं विचारल्यावर तिने “आम्ही तरी काय बोलणार?” असं उत्तर दिलं होतं.

काही अहवालांनुसार, करीनाने बिपाशाला कानशिलात लगावली आणि तिला थेट काळी मांजर म्हटलं. तर बिपाशाने करीनाला बालिश आणि अपरिपक्व म्हटलं होतं. रजत शर्मा यांच्या मुलाखतीत करीनाला या घटनेबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा तिने या प्रसंगाबद्दल थेट नकार दिला नाही. “मग मी काय पांढरी मांजर (सफेद बिल्ली) आहे का?” असं म्हणाली होती.

बिपाशा बासू करीना कपूरबद्दल काय म्हणाली होती?

२००५ मध्ये ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये बिपाशाने करीनाबरोबरच्या तिच्या संबंधांवर प्रतिक्रिया दिली होती. “दुसऱ्या शेड्युलमध्ये मला समजलं की तिला मी आवडत नाही. तिने माझ्याशी बोलणं बंद केलं. पण यामुळे मला काही फरक पडला नाही. कारण समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करते, किंवा तिचं तुमच्याबद्दल मत काय आहे हे समजल्यावर आयुष्य फार अवघड नसतं ‘मी तुला आवडत नाही आणि मी तुझ्याशी बोलणार नाही’ असं थेट सांगितल्यावर माझ्यासाठी ते स्वीकारणं सोपं होतं. कारण मला ढोंगी लोक अजिबात आवडत नाहीत,” असं बिपाशा बासू म्हणाली होती.

“मला तोंडावर ‘बघ, आपल्यात काहीतरी साम्य नाहीये, मी तुझ्याशी बोलणार नाही’ असं थेट सांगणारा माणूस मला जास्त आवडतो. पण जेव्हा आमचे एकत्र सीन असायचे, तेव्हा आम्ही अत्यंत प्रोफेशनली काम केलं. कोणतेही नखरे किंवा अडचणी आल्या नाहीत,” असं बिपाशा बासूने सांगितलं होतं.

बिपाशाने एका मुलाखतीत म्हटलं होतं की तिला उगाच या वादात ओढलं गेलं होतं. खरा वाद करीना व त्या डिझायनरमध्ये होता. हा वाद गरजेपेक्षा जास्त रंगवून सांगितला, असं तिचं मत होतं. दरम्यान, ‘अजनबी’नंतर बिपाशा आणि करीना दोघीही ‘ओमकारा’ चित्रपटात दिसल्या होत्या, पण त्यांचा एकत्र एकही सीन नव्हता.