Mumtaz Bollywood Actress controversy with journalist : मुमताज या बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने अनेकांची पसंती मिळवली. मुमताज अनेकदा कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. त्या मनमोकळेपणाने बोलत असतात आणि त्यांची मतं, प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. पण, एकदा मुमताज यांनी चक्क एका पत्रकाराला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती.
१९७० च्या दशकात पत्रकारांच्या लेखणीला खूप महत्त्व होतं. एका गॉसिप कॉलममुळे कलाकाराचं करिअर घडू किंवा बिघडू शकत होतं. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार त्या काळात देव्यानी चौबळ या सर्वात धाडसी आणि वादग्रस्त पत्रकारांपैकी एक मानल्या जात होत्या. त्या ‘स्टार अँड स्टाईल’ मासिकातील (Frankly Speaking) या लोकप्रिय कॉलमसाठी प्रसिद्ध होत्या.
एकदा त्यांनी मुमताज यांच्या खासगी आयुष्याबद्दल वादग्रस्त लेख लिहिला. त्यात त्यांनी मुमताज यांच्या वडिलांबद्दल धक्कादायक टिप्पणी केली होती. ज्यानंतर मुमताज यांना राग अनावर झालेला.अनेक कलाकार अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतात, पण मुमताज यांनी मात्र गप्प बसण्याऐवजी चौबळ यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. शेवटी देव्यानी चौबळ यांना माफी मागावी लागली. हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात…
नेमकं काय घडलेलं?
याबद्दल मुमताज यांनी विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “हो, तिने असा दावा केला होता की मुमताजचे वडील कोण आहेत हे कुणालाच माहिती नाही. मग मी तिला कोर्टात खेचलं.” मुमताज यांनी पुढे सांगितलं की त्यानंतर, त्यांनी हैदराबादमध्ये राहणाऱ्या त्यांच्या वडिलांशी संपर्क साधला. ते इराणी वंशाचे होते आणि त्यांनी दुसरं लग्न केलं होतं.
मुमताज वडिलांबद्दल म्हणाल्या, “मी त्यांना सांगितलं, एका पत्रकाराने दावा केला आहे की मला वडीलच नाहीत. हे ऐकून ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, मग मी कोण आहे?” यानंतर मुमताज यांनी वडिलांना सत्य समोर आणण्यासाठी कोर्टात येण्याची विनंती केली आणि त्यांनी त्यासाठी होकार दिला.
मुमताज यांनी दिलेली धमकी
मुमताज यांच्या मते, ही गोष्ट कळताच देव्यानी चौबळ घाबरल्या. मुमताज म्हणाल्या, “मी तिला धमकी दिली आणि सांगितलं, मी तुला तुरुंगात टाकेन. त्यानंतर ती माफी मागू लागली आणि म्हणाली, लोक असं बोलत होते म्हणून मी लिहिलं.” पुढे मुमताज यांनी पत्रकाराला जाब विचारला की, “इतकं अपमानास्पद कसं लिहू शकता?” हे ऐकून देव्यानी चौबळ रडू लागल्या अशी आठवण मुमताज यांनी सांगितली.
