When Neena Gupta Called Vivian Richards : अभिनेत्री नीना गुप्ता चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिल्या. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सबरोबर नीना गुप्ताचं अफेअर होतं. या अफेअरमधूनच त्यांनी मुलगी मसाबाला जन्म दिला होता. मुलीचा एकटीनेच सांभाळ केला आणि वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी विवेक मेहरांशी लग्न केलं.
नीना आणि विवियन जयपूरमध्ये भेटले होते. जयपूरच्या राणीने कलाकारांना आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला जेवायला बोलावलं होतं, तेव्हा नीना व विवियन यांची पहिली भेट झाली होती. दोघांची ओळख झाली, नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. विवियन रिचर्ड्स आधीच विवाहित होते. भारतातील क्रिकेटचा दौरा संपल्यावर ते मायदेशी परत गेले. त्यानंतर नीना गुप्तांना त्या गरोदर असल्याचं समजलं. मग नीना यांनी विवियन रिचर्ड्सला फोन करून गरोदर असल्याचं कळवलं होतं.
ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत नीना यांनी विवियनशी फोनवर झालेल्या संभाषणाची आठवण सांगितली. “गरोदर असल्याचं कळल्यावर मला खूप आनंद झाला होता, असं नाही. मी आनंदी होते, कारण मी त्याच्यावर प्रेम केलं होतं. मी त्याला फोन केला आणि विचारलं की ‘तुला हे मूल नको असेल तर मलाही नकोय’. तो म्हणाला, ‘मला हे मूल तुझ्यासाठी हवंय’. सर्वांनी मला सांगितलं, ‘नाही, बाळाला जन्म देऊ नकोस, तू एकटी सगळं कसं करू शकणार?’ कारण तो आधीच विवाहित होता आणि मी त्याच्याशी लग्न करू शकणार नव्हते. तसेच त्याच्याबरोबर राहण्यासाठी अँटिग्वाला जाऊ शकत नव्हते. पण जेव्हा तुम्ही तरुण असता ना तेव्हा तुम्ही प्रेमात आंधळे असता. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्ही कोणाचंही ऐकत नाही. कोणतीही मुलं त्यांच्या पालकांचं ऐकत नाहीत आणि मीही तशीच होते,” असं नीना गुप्ता म्हणाल्या होत्या.

विवियन रिचर्ड्सशी बोलल्यानंतर नीना गुप्ता यांनी बाळाला जन्म द्यायचं ठरवलं, पण घरी प्रचंड विरोध झाला. अखेर त्यांच्या वडिलांनी पाठिंबा दिला आणि मग विरोध मावळला. त्यानंतर नीना गुप्ता यांनी मुलीला जन्म दिला. ही मुलगी म्हणजे प्रसिद्ध फॅशन डिझायनर व अभिनेत्री मसाबा गुप्ता होय.
मसाबाला लहानपणीच वडिलांबद्दल सांगितलेलं – नीना गुप्ता
मसाबा लहान असतानाच नीना यांनी तिला वडिलांबद्दल सांगितलं होतं. “आम्ही (मी आणि विवियन) कधी कधी संपर्कात होतो, कधी नाही. पण मी मसाबाला सगळं मोकळेपणानं सांगितलं. मुलांना खरं सांगणं महत्वाचं आहे, अशा गोष्टी त्यांना इतर कुणीही सांगू शकतं, त्याऐवजी आपण सांगितलेलं चांगलं,” असं नीना गुप्ता म्हणाल्या होत्या.
नीना यांनी मसाबाला सिंगल मदर म्हणून सांभाळलं. त्यानंतर वयाच्या ४९ व्या वर्षी २००८ साली नीना गुप्ता यांनी लग्न केलं. नीना यांच्या पतीचं नाव विवेक मेहरा आहे.
मसाबा गुप्ता आता ३६ वर्षांची आहे. वर्षभरापूर्वी तीही आई झाली. मसाबाच्या दुसऱ्या लग्नात तिचे वडील विवियन रिचर्ड्सनी कुटुंबासह हजेरी लावली होती.
