बॉलीवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री आणि रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी गेली अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ७० च्या दशकात ‘बेबी सोनिया’ म्हणून बालकलाकार ते आघाडीची अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या नीतू कपूर यांनी २२ जानेवारी १९८० रोजी ऋषी कपूर यांच्याशी लग्न केलं आणि संसारात रमल्या. नणंद रितू नंदा यांच्या पुस्तकात नीतू यांनी स्वतः खुलासा केला होता की, एकदा ऋषी कपूर खूप दारू पिऊन घरी आले होते, ज्यामुळे चिडलेल्या नीतू फोनवर थेट आपले सासरे राज कपूर यांच्यावर ओरडल्या होत्या.

नीतू कपूर यांनी बालकलाकार म्हणून ‘दस लाख’ आणि ‘दो कलियाँ’ चित्रपट केले. नंतर मुख्य अभिनेत्री म्हणूनही त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले. याच दरम्यान त्यांची भेट ऋषी कपूर यांच्याशी झाली. दोघांची पहिली भेट १९७४ मध्ये ‘जहरीला इन्सान’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. ऋषी कपूर व नीतू या दोघांनी जवळपास १२ हून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली.

मैत्रीचं रुपांत पुढे प्रेमात झालं आणि ऋषी व नीतू यांनी लग्न केलं. लग्नानंतर नीतू कपूर अभिनय सोडून संसारात रमल्या. त्या मुलांच्या संगोपनात व सासरच्या मंडळींची काळजी घेण्यात वेळ घालवू लागल्या. नीतू कपूर यांनी सासरे राज कपूर यांच्याशी संबंधित एक किस्सा सांगितला होता. त्यांनी स्वतः नणंद रितू नंदा यांच्या ‘राज कपूर: द वन अँड ओन्ली शोमन’ या पुस्तकात याबद्दल लिहिलंय. नीतू कपूर एकदा चुकून सासरे राज कपूर यांना फोनवर रागावल्या होत्या, नंतर त्यांना या गोष्टीचा खूप पश्चात्ताप झाला होता.

नीतू कपूर सासऱ्यांवर का ओरडल्या होत्या?

एके दिवशी ऋषी कपूर खूप दारू पिऊन घरी आले होते. यामुळे चिडलेल्या नीतू यांनी त्यांना फोन केला आणि ओरडल्या. त्यांना वाटलं की फोनवर ऋषी कपूर आहेत, पण ते त्यांचे सासरे राज कपूर होते. नीतू ओरडल्यावर समोरून रागात आवाज आला, ‘तुला वडील आणि मुलाच्या आवाजातील फरक कळत नाही का?’ हे ऐकून नीतू हैराण झाल्या. राज कपूर व ऋषी कपूर या दोघांच्या आवाजात इतकं साम्य होतं की, फोनवर कोण बोलतंय तेच नीतू यांना समजलंच नाही. यामुळेच त्यांचा गैरसमज झाला आणि त्या चुकून सासऱ्यांवर ओरडल्या. नंतर मात्र त्यांना राज कपूर यांच्यावर ओरडून बोलल्याची त्यांना फार लाज वाटली होती, अशी कबुली त्यांनी स्वतःच दिली होती.