Dimple Kapadia Rajesh Khanna Divorce Secrets: बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या लग्नाची आणि त्यानंतरच्या दुराव्याची कथा नेहमीच चर्चेत राहिली आहे. अवघ्या १६ व्या वर्षी स्वतःपेक्षा १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या राजेश खन्नांशी डिंपल यांनी लग्न केले. दोन मुलींच्या जन्मानंतर नात्यात दुरावा आला आणि ते वेगळे राहू लागले, मात्र त्यांनी कधीच कायदेशीर घटस्फोट घेतला नाही. राजेश खन्ना यांनी एका मुलाखतीत डिंपल कपाडिया घटस्फोट का देत नाहीत यावर थेट उत्तर दिले होते.
राजेश खन्ना यांच्यापेक्षा डिंपल कपाडिया १५ वर्षांनी लहान होत्या. डिंपल यांनी अवघ्या १६ व्या वर्षी ३१ वर्षांच्या राजेश खन्नांशी लग्न केलं होतं. २७ मार्च १९७३ साली त्यांचं लग्न झालं. दोन्ही मुलींच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि ते वेगळे राहू लागले. पण त्यांनी कधीच कायदेशीररित्या घटस्फोट घेतला नाही.
राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांनी जवळपास ३ दशके वेगळं राहूनही घटस्फोट घेता नव्हता, त्यामागे नक्की काय कारण होतं याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या जायच्या. पण राजेश खन्ना यांनी एका मुलाखतीत त्याबद्दल टिप्पणी केली होती. त्यांचा तो व्हिडीओ आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. त्यात ते घटस्फोटाबद्दल बोलले होते.
घटस्फोटाबद्दल काय म्हणाले होते राजेश खन्ना?
“आम्ही वेगळे राहतोय, पण आतापर्यंत तिने घटस्फोट दिला नाही. ती कारण सांगत नाही. त्यामुळे ती का घटस्फोट देत नाहीये, हे तिलाच ठाऊक. मी फक्त इतकंच म्हणू शकतो की तिने घटस्फोट न देण्याचा निर्णय घेतला, ही तिची इच्छा आहे,” असं राजेश खन्ना म्हणाले होते.
राजेश खन्ना यांनी लग्न आणि बदलत्या काळाबद्दल आपलं मत व्यक्त केलं होतं. लग्नसंस्थेला काही लोक जुनी संकल्पना समजतात, असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच काही लोक आपली नाती व वैयक्तिक आयुष्याबद्दल जाहीरपणे बोलतात, तर काही मात्र आपले वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवणे पसंत करतात, असंही राजेश खन्ना म्हणाले होते.
दरम्यान, राजेश खन्ना डिंपल कपाडिया वेगळ्या राहू लागल्यानंतर अभिनेत्री अनिता अडवाणीबरोबर राहत होते. तर डिंपल यांचं सनी देओलशी अफेअर होतं अशा चर्चा आजही रंगतात. सनी देओलमुळेच डिंपल कपाडिया राजेश खन्नांना घटस्फोट न देता इतकी वर्षे वेगळ्या राहिल्या, असं म्हटलं जातं. पण डिंपल व सनी याबद्दल कधीच जाहीरपणे बोलले नाही. दुसरीकडे, राजेश खन्ना व अनिता अडवाणी यांचं नातं सर्वश्रुत होतं.
