Chetak Screen Awards: ५ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’ होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, या पुरस्कार सोहळ्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येतोय. २०१७ च्या स्क्रीन अवॉर्ड्सचे होस्ट शाहरुख खान आणि सलमान खान होते. त्यांनी ‘ये बंधन तो प्यार का बंधन है’ या गाण्यावर डान्स केला होता. तसेच त्यांनी एकमेकांची मस्करीही केली होती.
शाहरुखने सलमानच्या लग्नावरून मस्करी केली होती. संपूर्ण देश ज्याच्या लग्नाची वाट पाहत आहे, त्या सलमानने शेवटी या वर्षी लग्न करण्याचा संकल्प केला असावा, असं शाहरुख गंमतीने म्हणाला होता. त्यावर “माझं लग्न झालंय,” असं सलमानने म्हटलं होतं. या सोहळ्यात शाहरुख आणि सलमानने एकमेकांचे ब्लेझर घातले होते. स्टेजवर त्यांच्यातील मैत्री आणि प्रेम उपस्थितांना पाहायला मिळाले होते.
सलमान गमतीत शाहरुखला म्हणाला, “माझं लग्न झालंय.” यानंतर उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मग लगेच सलमानने म्हटलं की हे लग्न त्याने सर्वांपासून लपवून ठेवलंय. नंतर हे लग्न फक्त स्वप्नात झालं असून जेव्हा पत्नीचा चेहरा बघायला जातो तेव्हा घाबरून जागा होतो, असा विनोद सलमान खानने केला होता.
शाहरुखने सलमानच्या वैयक्तिक आयुष्यावर मिश्किल टिप्पणी केली. सलमानला एक मुलगी हवी आहे, तिचं नाव तो ‘सुलतानी खान’ ठेवेल आणि २०४२ मध्ये तिला अभिनेत्री म्हणून लाँच करेल, असं शाहरुख गमतीत म्हणाला होता.
पाहा व्हिडीओ
स्क्रीनच्या मंचावर सलमान खान व शाहरुख खान यांनी त्यांच्या भांडणाबद्दलही सांगितलं होतं. दोघांपैकी जास्त आनंदी कोण, यावरून भांडण झाल्याचं शाहरुख खानने म्हटलं होतं. तर शाहरुख लग्न करण्यासाठी माझी मनधरणी करत होता, त्यामुळे आमच्यात एक छोटं भांडण झालं होतं, असं सलमान खान गमतीत म्हणाला होता. दरम्यान, २००८ मध्ये त्यांच्यात वैयक्तिक कारणावरून बाचाबाची झाली होती, त्यामुळे अनेक वर्षे त्यांच्यात अबोला होता. २०१३ मध्ये बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत त्यांची पुन्हा मैत्री झाली आणि २०१७ च्या या सोहळ्यात दोघांनी एकत्र शोचे सूत्रसंचालन केले होते.
या अवॉर्ड सोहळ्यात उपस्थित सर्वांना एक भावनिक क्षण पाहायला मिळाला होता. जेव्हा स्टेजवर त्यांच्या ‘करण-अर्जुन’ चित्रपटातील एक क्लिप दाखवण्यात आली, तेव्हा शाहरुख आणि सलमान दोघेही भावुक झाले होते आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.
