रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या एकेकाळच्या अफेअरबद्दल इतक्या वर्षांनीही चर्चा होत असते. ‘दो अनजाने’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘सुहाग’ आणि ‘सिलसिला’ यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या जोडीने १९८१ नंतर कधीही एकत्र काम केले नाही. सिमी गरेवाल यांच्या ‘Rendevouz with Simi Garewal’ या प्रसिद्ध चॅट शोमध्ये जेव्हा रेखा यांना अमिताभ यांच्यावरील प्रेमाबद्दल थेट प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा रेखा यांनी दिलेले उत्तर खूपच चर्चेत राहिले होते.
१९७० च्या दशकात ‘दो अनजाने’ (१९७६) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढण्यास सुरुवात झाली, असं म्हटलं जातं. त्यानंतर ‘सुहाग’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘मिस्टर नटवरलाल’ आणि ‘सिलसिला’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांची पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. याच काळात चित्रपटसृष्टी आणि प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला. अमिताभ यांचे आधीच जया बच्चन यांच्याशी लग्न झालेले असल्याने, रेखा यांच्याबरोबरच्या त्यांच्या कथित नातेसंबंधांबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या.
रेखा व अमिताभ बच्चन यांनी सिलसिलानंतर एकत्र केलं नाही काम
१९८१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सिलसिला’ हा यश चोप्रा यांचा चित्रपट या दोघांच्या कारकीर्दीतील एकत्र शेवटचा चित्रपट ठरला. विशेष म्हणजे, या चित्रपटातील रेखा, अमिताभ आणि जया बच्चन यांच्या भूमिका त्यांच्या खऱ्या आयुष्यातील परिस्थितीशी मिळत्या-जुळत्या असल्याचं बोललं गेलं. ‘सिलसिला’नंतर अमिताभ आणि रेखा यांनी पुन्हा कधीही एकत्र काम केलं नाही आणि सार्वजनिक ठिकाणीही एकमेकांपासून अंतर राखलं. अमिताभ बच्चन यांनी या नात्यावर नेहमीच मौन बाळगले, तर रेखा यांनी विविध मुलाखतींमध्ये अमिताभ यांच्याविषयीचं प्रेम, आदर आणि भावना अप्रत्यक्षपणे व्यक्त केल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? रेखा म्हणालेल्या…
एकदा रेखा यांना अमिताभ यांच्याबद्दल थेट प्रश्न विचारण्यात आला होता. ‘Rendevouz with Simi Garewal’ या खास चॅट शोमध्ये सिमी गरेवाल यांनी रेखा यांना अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? असा प्रश्न केला होता. याचं उत्तर देत रेखा म्हणालेल्या, “अर्थात, आजपर्यंत मला एकही पुरुष, स्त्री, लहान मूल किंवा वृद्ध माणूस सापडला नाही जो त्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम करत नाही, मग माझं प्रेम कसं नसेल?”
रेखा यांनी सिमी गरेवाल यांनी विचारलेल्या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर दिलं होतं. पण सिमीवर मात्र टीका झाली होती. दरम्यान, रेखा यांनी आजवर अनेकदा अमिताभ बच्चन यांच्यावरचं प्रेम, त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला आहे. एकदा अमिताभ बच्चन यांना पुरस्कार मिळाला होता, तेव्हा आनंदी झालेल्या रेखा थेट जया बच्चन यांच्याजवळ जाऊन उभ्या राहिल्या होत्या आणि त्यांनी जया यांच्याबरोबर उभे राहून बिग बींना हा पुरस्कार स्वीकारताना पाहिलं होतं.
