सैफ अली खानच्या वांद्रे पश्चिम येथील घरात १६ जानेवारी रोजी एक दरोडेखोर घुसरा होता. या दरोडेखोरापासून मुलांना वाचवताना सैफ गंभीर जखमी झाला होता. या हल्ल्यानंतर सैफला रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आले. सैफच्या पाठीत दरोडेखोराने खुपसलेले चाकूचे टोक अडकले होते, ते लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून काढले. सैफ आता बरा झाला आहे. त्याला ५ दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सैफला रुग्णालयात नेलं तेव्हा त्याच्याबरोबर तैमूर होता. पण सैफच्या रुग्णालयातील मेडिकल फॉर्मवर अफसर झैदी हे नाव पाहायला मिळतंय. तर हा अफसर झैदी कोण आहे, ते जाणून घेऊयात.

सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर जखमी झालेल्या सैफ अली खानला कोणी रुग्णालयात नेलं, याबाबत बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. काहींना इब्राहिम अली खानने नेल्याचा दावा केला, तर काहींनी आठ वर्षांच्या तैमूरने बाबाला रुग्णालयात नेल्याचं म्हटलं गेलं. आता नवीन माहितीनुसार, सैफ व तैमूरबरोबर आणखी एक व्यक्ती रुग्णालयात गेली होती. त्या व्यक्तीचं नाव अफसर झैदी आहे. अफसर लिलावती रुग्णालयात सैफबरोबर गेला होता, कारण सैफच्या मेडिकल फॉर्मवर त्याचे नाव होते. अफसरने आता पुष्टी केली आहे की हल्ल्याच्या रात्री तो हॉस्पिटलमध्ये गेला होता, पण तो सैफबरोबर गेला नव्हता, त्याला सैफच्या कुटुंबियांनी फोन केल्यावर तो रुग्णालयात गेला होता. सैफबरोबर त्यावेळी तैमूर होता आणि तो फॉर्म भरण्यासाठी खूप लहान असल्यामुळे अफसरने त्या फॉर्मवर सही केली.

अफसर झैदी कोण आहे?

अफसर झैदी हा सैफचा जुना मित्र आहे. तसेच तो त्याचा बिझनेस पार्टनरही आहे. तो सैफच्या कपड्याच्या ब्रँडचा सह-संस्थापक आहे. तसेच अफसर हा सैफच्या एक्सीड एंटरटेनमेंट या मनोरंजन मॅनेजमेंट कंपनीचा संस्थापक देखील आहे. अफसरची सैफसह आणखी एका बॉलीवूड स्टारशी खूप चांगली मैत्री आहे, तो अभिनेता म्हणजे हृतिक रोशन होय. अफसर हा हृतिकच्या फिटनेस ब्रँडचा सह-संस्थापक आणि सीईओ आहे.

दरम्यान, हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवला आहे. सैफने पोलिसांना घडलेला घटनाक्रम सांगितला. आरोपी हातात चाकू घेऊन आला होता, त्याला पाहून जेह व त्याची नॅनी रडू लागले, त्यांचा आवाज ऐकून त्या खोलीत गेल्याचं सैफ म्हणाला.

Story img Loader