Who is Kumod Raney : सलमान खान व त्याच्या कुटुंबाचे व्हिडीओ दोन दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत सलमान खान रडताना दिसला, तर खान कुटुंबीयही भावुक पाहायला मिळाले. सलमान खानची जवळची मैत्रीण कुमुद राणे हिचं कॅन्सरमुळे निधन झालं. त्यामुळे सलमानसह त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सलमान व त्याचे कुटुंबीय ९ जून रोजी कुमुद राणेच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले. जिच्या निधनाने सलमान खानला अश्रू अनावर झाले ती कुमुद राणे नेमकी कोण आहे? ते जाणून घेऊयात.

कुमुद राणे कोण होती?

कुमुद राणे ही एक महिला उद्योजक आणि दुबईतील ‘रेन ब्यूटी बार’ची संस्थापक होती. ब्युटी आणि वेलनेस इंडस्ट्रीत दिलेल्या योगदानासाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. कुमुद राणेचे सलमान खानच्या कुटुंबाशी खूप चांगले संबंध होते. ती सलमान खानची जवळची मैत्री होती. कुमुद मागच्या काही काळापासून कॅन्सरशी झुंज देत होती. उपचारादरम्यान तिचं निधन झालं. तिच्या निधनाने सलमान खानला अश्रू अनावर झाले. कुमुदला अखेरचा निरोप देण्यासाठी सलमान खानबरोबर त्याची आई सलमा खान, हेलन, तसेच सोहेल खान, निर्वाण खान, अरहान खान आणि अर्पिता खान शर्मा देखील उपस्थित होते.

सोहेल खानने पोस्ट शेअर करून वाहिली श्रद्धांजली

सोहेल खानने सोशल मीडियावर कुमुद राणेसाठी एक भावुक पोस्ट शेअर केली. “आज मी माझी लाडकी बहीण गमावली. या जगात तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. कुमुद राणे कबीर आणि कुग्गीसाठी त्यांचा जगण्याचा आधार होती. आयुष्य किती अन्याय करतं, अशा कठीण प्रसंगी माणूस देवावरच प्रश्न उपस्थित करू लागतो. मी प्रार्थना करतो की कुमुद जिथे कुठे असेल तिथे सुखात असेल. तुझी कायम आठवण येत राहील,” असं सोहेलने लिहिलं.

अर्पिता खान शर्मानेही वाहिली श्रद्धांजली

सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माने देखील इन्स्टाग्राम स्टोरीवर कुमुदबरोबरचा एक फोटो शेअर करून श्रद्धांजली वाहिली. “प्रिय कुमुद, आपण एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण आम्हाला नेहमीच लक्षात राहील. तुझा आपलेपणा, तुझं प्रेम आणि तुझा विनोदी स्वभाव याची आम्हाला कायम आठवण येईल. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुझ्या आत्म्याला शांती लाभो,” असं अर्पिताने लिहिलं.

खान कुटुंबाबरोबरच कुमुद राणेची अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींशी मैत्री होती. सलमान खान, मलायका अरोरा, बॉबी देओल, बीना काक यांची ती मैत्रीण होती.