Who is Nabeel Gabol Dhurandhar 2: आदित्य धरच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाच्या यशामुळे पाकिस्तानी राजकारणी नबील गबोल सध्या चर्चेत आले आहेत. सुरुवातीला चित्रपटातील ‘जमील जमाली’ हे पात्र आपल्यासारखे वाटते म्हणून गबोल यांनी आनंद व्यक्त केला होता. पण आता मात्र ते घाबरल्याचं म्हटलं जातंय. कारण, चित्रपटात जमाली हे पात्र एक भारतीय गुप्तहेर असल्याचं दाखवण्यात आले आहे. यावरून सोशल मीडियावर नेटकरी त्यांची चांगलीच फिरकी घेत आहेत.
जगभरात १३०० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या ‘धुरंधर २’ मधील सर्वच पात्रांची सोशल मीडियावर चर्चा आहे. राकेश बेदी यांनी या चित्रपटात जमील जमाली हे पात्र साकारलंय. हे पात्र नबील गबोल यांच्यापासून प्रेरित आहे, असं म्हटलं जातंय. सिनेमात जमील जमाली दाऊद इब्राहिमला भेटतो, असं दाखवण्यात आलंय. पण नबील गबोल यांनी कधीच दाऊदला न भेटल्याचा दावा केला आहे. धुरंधरच्या निमित्ताने चर्चेत असलेले नबील गबोल कोण? ते जाणून घेऊयात.
नबील गबोल कोण आहेत?
नबील गबोल हे कराचीमधील पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) एक महत्त्वाचे नेते आहेत. ते ल्यारी या भागाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची राजकीय कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली राहिली. तब्बल २० वर्षे पीपीपीमध्ये राहिल्यानंतर, २०१३ मध्ये त्यांनी पक्ष सोडला होता, त्यानंतर एमक्यूएममध्ये प्रवेश केला आणि २०१७ मध्ये पुन्हा मुलासह पीपीपीमध्ये परतले. यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलंय.
धुरंधर चित्रपट प्रदर्शित झाल्यावर गबोल यांनी मुलाखतींमध्ये त्याबद्दल बोलत आणि गाण्यांवर रील बनवत या प्रसिद्धीचा आनंद घेतला होता. पण चित्रपटाच्या दुसऱ्या भागात त्यांचे पात्र भारतीय गुप्तहेर निघाल्याने, त्यांनी आता लोकांशी संपर्क कमी केला असून ते काळजीत आहेत, असं म्हटलं जातंय. नबील यांनी जमील जमाली हे पात्र साकारणाऱ्या राकेश बेदींना ‘आय लव्ह यू’ असं एका मुलाखतीत म्हटलं.
नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांची जोरदार खिल्ली उडवली आहे. एकाने लिहिलं, “आधी नबील गबोल मोठेपणा मिरवत होते, पण चित्रपट पाहिल्यावर आता ते पूर्णपणे घाबरले आहेत.” दुसऱ्याने गंमतीने म्हटलं, “जर आता पाकिस्तान आर्मीने त्यांना उचललं, तर आश्चर्य वाटायला नको.” तिसऱ्याने लिहिलं, “आता गबोल स्वतःला जमील जमाली पात्रापासून साइडलाइन करत आहेत.”
राकेश बेदी यांचे स्पष्टीकरण
या चित्रपटात जमील जमालीची भूमिका साकारणारे अभिनेते राकेश बेदी यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना स्पष्ट केलं की, “मी त्यांची भूमिका केलेली नाही. ते स्वतःला या पात्राशी का जोडत आहेत, हे मला समजत नाही. मी फक्त भूमिकेसाठी एक विशिष्ट लूक स्वीकारला होता. जर कोणाला माझा चेहरा त्यांच्यासारखा वाटत असेल, तर त्यात माझा काय दोष? विग आणि स्टाईलिंगमुळे कदाचित त्यांना तसं वाटलं असावं, पण तो त्यांचा वैयक्तिक दृष्टिकोन आहे.”
नबील गबोल यांची ल्यारीतील चित्रणाबद्दल प्रतिक्रिया
गाबोल यांनी धुरंधर चित्रपटावर टीका केली आहे. चित्रपटात ल्यारी भागातील गुन्हेगारी अतिशयोक्तीपूर्ण दाखवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही आखाती देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घातल्याबद्दल त्यांनी आभार मानले, जेणेकरून जगासमोर त्यांची चुकीची प्रतिमा जाणार नाही.
