Ramayana Movie Teaser, Release Date : नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. या दोन भागांतील भव्य चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या प्रदर्शनाला अजून सात महिने उरले आहेत. हनुमान जयंतीच्या निमित्ताने निर्मात्यांनी रणबीर कपूरचा ‘प्रभू श्रीराम’ या रूपातील पहिला लूक सादर केला. रणबीरने एका मुलाखतीत कबूल केलं की, सुरुवातीला तो ही मोठी भूमिका साकारण्यास कचरत होता, पण २०२२ मध्ये मुलगी राहाच्या जन्मानंतर त्याच्यात जो बदल झाला, त्यामुळे त्याने या भूमिकेसाठी होकार दिला.

या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा (प्राईम फोकस स्टुडिओ) आणि ‘यश’ (मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स) एकत्रितपणे करत आहेत. या चित्रपटात कोणते कलाकार कोणत्या भूमिकेत झळकणार आहेत, ते जाणून घेऊयात.

साई पल्लवी – सीता

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी प्रभू श्रीरामांची पत्नी ‘सीता’ यांची भूमिका साकारणार आहे. ‘फिदा’ आणि ‘लव्ह स्टोरी’ यांसारख्या सुपरहिट तेलगू चित्रपटांसाठी ती ओळखली आहे. ‘रामायण’पूर्वी ती आमिर खानचा मुलगा जुनैद खानबरोबर ‘एक दिन’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Award Banner

यश – रावण

‘KGF’ फेम कन्नड सुपरस्टार यश या चित्रपटात खलनायक म्हणजेच ‘रावण’ची भूमिका साकारणार आहे. तो या चित्रपटाचा सह-निर्माता देखील आहे. रामायण प्रदर्शित होण्यापूर्वी तो ‘टॉक्सिक’ या चित्रपटात दिसणार आहे.

सनी देओल – हनुमान

‘गदर २’ आणि ‘बॉर्डर २’ च्या यशानंतर सनी देओल आता रामायणमध्ये ‘हनुमान’ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. “हनुमानजींची भूमिका साकारणे कठीण आहे,” अरं सनी देओल म्हणाला होता.

रवी दुबे – लक्ष्मण

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता रवी दुबे प्रभू श्रीरामांचा धाकटा भाऊ ‘लक्ष्मण’ची भूमिका साकारणार आहे. रणबीर खूप शांत आहे, असं रवी म्हणाला होता.

अरुण गोविल – राजा दशरथ

रामानंद सागर यांच्या जुन्या ‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आता या नवीन चित्रपटात श्रीरामाचे वडील ‘राजा दशरथ’ यांची भूमिका साकारणार आहेत. त्यांनी रणबीर कपूरचे कौतुक करत त्याला या भूमिकेसाठी आशीर्वाद दिले आहेत.

लारा दत्ता – कैकेयी

अभिनेत्री लारा दत्ता राजा दशरथांची पत्नी ‘कैकेयी’च्या भूमिकेत दिसणार आहे. कैकेयी ही भरतची आई असते, जी आपल्या मुलाला गादी मिळावी म्हणून रामाला १४ वर्षांच्या वनवासाला धाडते. ‘रामायण’पूर्वी लारा ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात दिसणार आहे.

इंदिरा कृष्णन – कौशल्या

‘कहानी घर घर की’ आणि ‘ये है चाहतें’ फेम ज्येष्ठ टीव्ही अभिनेत्री इंदिरा कृष्णन या चित्रपटात रामाची आई ‘कौशल्या’ यांची भूमिका साकारत आहेत. झूमला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, रणबीर कपूरनेच या भूमिकेसाठी त्यांचं नाव सुचवलं होतं. यापूर्वी त्यांनी ‘ॲनिमल’ (२०२३) चित्रपटात रश्मिका मंदानाच्या आईची भूमिका केली होती.

काजल अग्रवाल – मंदोदरी

‘मगाधीरा’, ‘सिंघम’ आणि ‘स्पेशल २६’ सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेली काजल अग्रवाल यात रावणची पत्नी ‘मंदोदरी’च्या भूमिकेत दिसणार आहे. ती पहिल्यांदाच दाक्षिणात्य स्टार यशबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

रकुल प्रीत सिंग – शुर्पणखा

‘दे दे प्यार दे’ आणि ‘अयालान’ फेम रकुल प्रीत सिंग रावणाची बहीण ‘शुर्पणखा’ची भूमिका साकारणार आहे. रामायणातील कथेनुसार, लक्ष्मण तिचे नाक कापतो, ज्याचा बदला घेण्यासाठी रावण सीतेचे अपहरण करतो.

शीबा चड्ढा – मंथरा

‘बधाई हो’, ‘गली बॉय’ आणि ‘मिर्झापूर’ फेम शीबा चड्ढा यात ‘मंथरा’ची भूमिका साकारणार आहे.

कुणाल कपूर – इंद्रदेव

‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता कुणाल कपूर यात ‘इंद्रदेव’च्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी त्याने आपल्या नवीन लूकची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली होती.

फैसल मलिक – कुंभकर्ण

‘पंचायत’ या प्रसिद्ध वेब सीरिजमधील ‘प्रल्हाद चा’ या भूमिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता फैसल मलिक यात रावणाचा धाकटा भाऊ कुंभकर्णची महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

विवेक ओबेरॉय – विद्युतजिह्वा

‘कंपनी’ आणि ‘क्रिश ३’ मध्ये खलनायक साकारणारा विवेक ओबेरॉय या चित्रपटात शुर्पणखेचा पती ‘विद्युतजिह्वा’च्या भूमिकेत दिसणार आहे.

राघव जुयाल – मेघनाद

‘किल’ चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेला राघव जुयाल रावणाचा मुलगा ‘मेघनाद’ची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेत त्याने विक्रांत मॅस्सीला रिप्लेस केलंय. राघव ‘रामायण’च्या दुसऱ्या भागात दिसेल, जो पुढच्या वर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग याच वर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.