Tabu on Akshay Kumar: सध्या अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ या चित्रपटाचादेखील समावेश आहे. भूत बंगला या चित्रपटात अक्षय कुमारसह राजपाल यादव, परेश रावल, असरानी, तब्बू, मिथिला पालकर असे अनेक लोकप्रिय कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला. काही वेळा खळखळून हसवणारे विनोद ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले. तर, काही वेळा भीतीदायक सीनही पाहायला मिळाले. तब्बूच्या लूकनेदेखील लक्ष वेधून घेतले.
“अक्षयही माझ्या आयुष्यातून…”
ट्रेलर लॉन्चदरम्यान तब्बू व अक्षय कुमार यांनी २५ वर्षे एकत्र काम का केले नाही? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर तब्बू मजेशीर उत्तर देत म्हणाली, “भूते जशी गायब होतात, तसाच अक्षयही माझ्या आयुष्यातून गायब झाला. त्यामुळे आम्ही इतकी वर्षे एकत्र काम करू शकलो नाही.”
“आम्ही दोघे एकत्र काम…”
अक्षय या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाला, “हेरा फेरी सिनेमानंतर असा कोणता चित्रपट आम्हाला मिळाला नाही, ज्यामध्ये आम्ही काम करू शकू. तब्बू तिच्या कामात व्यग्र होती. मी माझ्या कामात व्यग्र होतो आणि प्रियदर्शन सर माहित नाही कशात व्यग्र होते. मात्र, भूत बंगला हा असा सिनेमा आहे, ज्यामध्ये आम्ही दोघे एकत्र काम करू शकू असे आम्हाला वाटले. हाच आमच्यासाठी योग्य सिनेमा आहे.”
“दोघांमध्ये एकच गोष्ट बदलली आहे, ती म्हणजे….”
२५ वर्षांत दोघांमध्ये काय बदल झाला? यावर दिग्दर्शक प्रियदर्शन उत्तर देत म्हणाले, “माझ्या मते, दोघांमध्ये काहीही बदल झाला नाही. तब्बू आजही तितकाच त्रास देते. मी तिच्याबरोबर ८ चित्रपट केले आहेत. दोघांमध्ये एकच गोष्ट बदलली आहे, ती म्हणजे दोघांचे डोक्यावरील पुढचे केस कमी झाले आहेत.”
तब्बू अक्षयबद्दल म्हणाली, “मला वाटते की, अक्षय थोडा बदलला आहे. तो आता कमी प्रमाणात खोड्या काढतो. मात्र, फिटनेसच्या बाबतीत आजही तसाच आहे. अमुक अमुक पदार्थ खाऊ नकोस, असे तो मला सेटवर सतत सांगत असे.”
दरम्यान, भूत बंगला हा सिनेमा १६ एप्रिल २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.
