Amitabh Bachchan stays up until 4 am : वय हा फक्त आकडा असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन. ८३ व्या वर्षीही त्यांची कामाविषयीची तळमळ आणि शिस्त पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे बिग बी आजही तेवढ्याच उत्साहाने काम करीत आहेत. अभिनय आणि इतर प्रकल्पांमध्ये व्यग्र असतानाही ते नियमितपणे ब्लॉग लिहून चाहत्यांशी संवाद साधतात. नुकत्याच लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी आजही नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
बिग बी हे दररोज ब्लॉग शेअर करून त्यांचे अनुभव शेअर करीत असतात. त्यांनी आतापर्यंत ६,६८५ ब्लॉग लिहिले असून, त्यामधून ते चाहत्यांशी संवाद साधतात. दर रविवारी अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी होत असते. स्वतः घराबाहेर येऊन ते चाहत्यांची प्रत्यक्ष भेट घेतात. त्याचे काही फोटो शेअर करीत, त्यांनी नवीन काळातील टेक्नॉलॉजीवर भाष्य केले आहे.
…हे आजच्या पिढीला कळणार नाही – अमिताभ
अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे की, आज दिवसभरामध्ये अनेक नवीन गोष्टी शिकलो. १९४० च्या दशकात वाढलेल्या आमच्या पिढीला तितक्या सोई-सुविधा मिळत नव्हत्या. आज सहज वापरत असलेल्या टेक्नॉलॉजीबद्दल आम्हाला तेव्हा फारशी माहिती नव्हती. त्यामुळे त्या काळात आम्ही कसे जगलो आणि कोणत्या परिस्थितीत वाढलो, हे आजच्या पिढीला समजणे अशक्य आहे.
…पण नंतर परिस्थिती बदलली
पुढे त्यांनी लिहिले की, नवीन पिढीचे विचार आणि दृष्टिकोन योग्य आहे; पण आमचाही दृष्टिकोन तितकाच बरोबर आहे. असा एक काळ होता, जेव्हा आम्हाला टेलिफोन म्हणजे काय हेही माहीत नव्हते. घरात फ्रिज व एसी नव्हता; पण नंतर परिस्थिती बदलली आणि या सर्व गोष्टी मिळाल्या. पण, त्यावेळी आम्हाला झालेला आनंद आणि उत्साह पाहून आजच्या पिढीला आश्चर्य वाटू शकते. मात्र, ज्या वेगाने प्रगती होत आहे, ते बघून नवीन पिढीलासुद्धा असाच आश्चर्याचा धक्का बसू शकतो, असे मत अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले आहे.
‘हे’ दोन शब्द आजही सर्वांत प्रभावी
पुढे अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे की, या वयातही आम्हाला नव्या गोष्टी शिकण्याची इच्छा आहे. काही जण बदल स्वीकारण्याऐवजी शांतपणे जगाकडे बघत असतात; पण काहींना बदलत्या काळाचा आनंद घेण्यासाठी ही नवी टेक्नॉलॉजी समजून व शिकून घ्यायची आहे. पुढे अमिताभ बच्चन यांनी आयुष्यातील महत्त्वाचे दोन शब्द सांगितले आहेत. ‘हो’ आणि नाही’ हे दोन शब्द आजही आयुष्यातील सर्वांत प्रभावी आणि महत्त्वाचे शब्द आहेत, असे अमिताभ बच्चन यांनी नमूद केले आहे.
का होते पहाटे ४ वाजेपर्यंत जागे?
अमिताभ बच्चन यांनी आणखी एका ब्लॉगमध्ये ते पहाटे ४ पर्यंत जागे असल्याचे सांगितले आहे. ८३ वर्षांच्या अमिताभ बच्चन यांनी ते पहाटेपर्यंत काम करीत असल्याचे नमूद केले. पहाटे ४ वाजेपर्यंत काम करीत होतो आणि आता पुन्हा कामासाठी तयार आहे, अशा आशयाची पोस्ट अमिताभ बच्चन यांनी केली. त्यामुळे तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा अजूनही कामाप्रति असणारा उत्साह आणि निष्ठा यांचे सर्वांनी त्यांचे कौतुक केले आहे.
