Why Anju Mahendru never married after breakup with Rajesh Khanna: राजेश खन्नांच्या खासगी आयुष्याची आजही वेळोवेळी चर्चा होताना दिसते. कधी त्यांच्या मुलींनी त्यांच्या सांगितलेल्या आठवणींमुळे, कधी त्यांची पत्नी डिंपल कपाडिया यांनी केलेल्या वक्तव्यामुळे, तर कधी सहकलाकारांनी त्यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितलेला अनुभव, आठवणी या सगळ्यांमुळे राजेश खन्ना यांची वेळोवेळी चर्चा होताना दिसते.
या सगळ्याबरोबरच, राजेश खन्ना व त्यांच्या रिलेशनशिपचीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा होते. अंजू महेंद्रू व त्यांच्या नात्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अंजू महेंद्रू यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर राजेश खन्नांनी डिंपल कपाडियांबरोबर लग्नगाठ बांधली. मात्र, अंजू महेंद्रू अविवाहित राहिल्या. एका मुलाखतीत त्यांनी लग्न करण्याबद्दल वक्तव्य केले होते.
“मी एकटी राहत….”
सुहाना सफरला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणालेल्या, “मी एकटी राहते, मी माझ्या आयुष्याचा सर्वाधिक काळ माझ्या आईबरोबर राहिले आहे. तिचे निधन झाले, त्यानंतर आयुष्य बदलले. माझी बहीण व तिचा नवरा मला भेटत असतात, मला एकटे वाटत नाही.”
जेव्हा त्यांना लग्नाबद्दल विचारले, त्यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या, “मला कोणाचीतरी साथ मिळावी यासाठी मी लग्न करावे, असे अनेकांनी सुचवले आहे. माझे उत्तर नेहमी हेच असते, तुम्ही वेडे झाला आहात का? या वयात लग्न करायचे म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या किंवा माझ्या वयाच्या व्यक्तीशी मला लग्न करावे लागणार. मग आम्ही कशाबद्दल बोलणार? औषधे किंवा ब्लड प्रेशर याबद्दल आम्हाला बोलावे लागेल. मला हे सगळं नको आहे. मी जशी आहे तशी आनंदी आहे. मला एकटेपणा जाणवायला वेळच नाही. जगात खूप काही घडत असते आणि मी स्वतःला व्यग्र ठेवते.”
राजेश खन्ना व अंजू महेंद्रू हे एका नाटकादरम्यान भेटले होते. अंजू यांनी वयाच्या १३ व्या वर्षी मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांच्यातील नाते त्यांनी कधीही लपवले नाही. राजेश खन्ना एका रात्रीत लोकप्रिय झाले; अंजू मात्र संघर्ष करीत होत्या. त्यांना छोट्या छोट्या भूमिका मिळत असत. राजेश खन्ना यांनी आशीर्वाद हे घर खरेदी केले होते आणि ते घर अंजू सांभाळायच्या. अनेक जण असे म्हणतात की, राजेश खन्ना यांनी ते घर त्यांना भेट म्हणून दिले होते. प्रत्येक पार्टी व प्रत्येक कार्यक्रम अंजू यांच्या देखरेखीखाली पार पडत असे.
दरम्यान, राजेश खन्ना व अंजू बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, शेवटी हे नाते संपुष्टात आले. त्यानंतर राजेश खन्नांनी डिंपल कपाडियांबरोबर लग्न केले.
