चित्रपट सृष्टीत चार दशकांहून अधिक काळ सक्रिय असलेले दिग्गज अभिनेते अनुपम खेर आजही मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घरात न राहता भाड्याच्या घरात राहतात. कोट्यवधींची कमाई आणि जागतिक स्तरावर नाव असूनही त्यांनी हा निर्णय का घेतला, याबाबत त्यांनी नुकताच एक खुलासा केला आहे. विशेष म्हणजे, त्यांचे जुहू येथील घर अभिनेत्री आलिया भट्टने विकत घेतले आहे. स्वतःसाठी घर का घेतलं नाही, याचं कारण अनुपम खेर यांनी ‘द पॉवरफुल ह्यूमन्स ऑफिशियल’शी बोलताना सांगितलं.

आईसाठी शिमल्यात ८ खोल्यांचे घर घेतले

“मी माझ्या आईसाठी घर विकत घेतलं, कारण तिला शिमल्यात घर हवं होतं. एके दिवशी तिने मला सांगितलं की तिला तिथे स्वतःचं घर असावं असं वाटतं. तिने आयुष्यातील ६० वर्षे भाड्याच्या घरात काढली होती, त्यामुळे आता तिला स्वतःच्या हक्काचं घर हवं होतं. आम्ही शिमल्याला गेलो आणि तिच्यासाठी घर शोधलं. तिला खरंतर १ बेडरुमचं छोटं घर हवं होतं, पण मी तिला ८ बेडरुम आणि हॉल असलेलं मोठं घर घेऊन दिलं. या काही प्रतिकात्मक गोष्टी असतात, कारण त्याशिवाय तुम्ही इतरांसमोर आदर्श कसा ठेवणार?” असं अनुपम खेर म्हणाले.

‘घर स्वतःचं असो किंवा भाड्याचं, काय फरक पडतो?’

स्वताचं घर न घेण्याचा हा निर्णय भौतिक गरजा आणि वैयक्तिक प्रगतीबद्दलच्या एका सखोल जाणिवेतून आला आहे. त्यांच्या मते, एका टप्प्यानंतर मालमत्ता माणसाच्या आयुष्याची ओळख ठरत नाही. “मी स्वतःची तुलना गौतम बुद्धांशी करत नाहीये, पण ते एक राजकुमार होते. जेव्हा त्यांनी बाहेरच्या जगात लोकांचं जगणं पाहिलं, तेव्हा त्यातूनच ते ‘गौतम बुद्ध’ झाले. मला असं वाटतं की, एकदा का तुम्ही पैसे कमावले की तुम्हाला नक्की कशाची गरज असते? राहण्यासाठी जागा हवी असते, मग ती स्वतःची असो किंवा भाड्याची, त्याने काही फरक पडत नाही. तुम्हाला एक गाडी लागते आणि सोबत काम करायला एक-दोन माणसं लागतात. त्यापलीकडे जाऊन मी चांदीची चपाती खाऊ शकत नाही किंवा अन्नावर सोन्याचा वर्ख लावू शकत नाही. यालाच ‘माणूस म्हणून प्रगल्भ होणं’ म्हणतात. मी स्वतःला साधू-संत म्हणवून घेत नाहीये. मी ‘सारांश’ चित्रपटासाठी १०,००० रुपये कमावले होते आणि आज मी त्यापेक्षा खूप जास्त कमावतोय, हे एक वेगळे यश आहे. आपण काय करू शकतो हे पाहण्यासाठी आपण प्रयत्न करतो,” असं अनुपम खेर म्हणाले.

माणसाच्या मृत्यूनंतर मालमत्ता अनेकदा वादाचं कारण ठरते, असं स्पष्ट मत अनुपम खेर यांनी मांडलं. “मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा मालमत्तेवरून वाद होतात. पण जर तुमच्याकडे वाटण्यासाठी फक्त पैसे असतील, तर वाद कमी होतात. मी अनेक वृद्ध लोकांना पाहतो आणि मला धक्का बसतो, कोणाच्या मुलाने त्यांना घराबाहेर काढलं असतं, तर कोणावर मृत्यूपत्रावर सही करण्यासाठी दबाव टाकला जातो. माझ्या घरात असं काही नाही, पण तरीही माझ्यावर ओझं नसेल तर मी तितकाच आयुष्यात प्रगती करू शकेन,” असं अनुपम खेर म्हणाले.

आलिया भट्टने विकत घेतले अनुपम खेर यांचे घर

“१० वर्षांपूर्वी मी ठरवलं की मला घराची गरज नाही. मी माझं घर विकलं, ते आलियाने विकत घेतलं. त्यानंतर मी आणि किरण दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. आम्हाला वाटले की जोपर्यंत नवीन घर मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथे राहू, पण घर शोधायला आम्हाला चार वर्षे लागली. दरम्यान, किरण खासदार झाली आणि चंदीगडला स्थायिक झाली. एका क्षणी मला प्रश्न पडला की आपण घर इतकं का शोधतोय? आता आम्ही तिथेच भाड्याच्या घरात राहू लागलो आहोत आणि हे जास्त सोपंय असं मला जाणवलं,” असं अनुपम खेर म्हणाले.

‘किरणला समजायला थोडा वेळ लागला’

२०२४ मध्ये ‘कर्ली टेल्स’शी बोलताना अनुपम खेर यांना विचारण्यात आलं की, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री-राजकारणी किरण खेर यांचंही घर न घेण्याबाबत हेच मत आहे का? त्यावर ते म्हणाले, “तिला हे स्वीकारायला थोडा वेळ लागला, पण आता ठीक आहे. तिचं चंदीगडमध्ये स्वतःचं घर आहेच.”

मिळालेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये मुंबईतील जुहू परिसरातील एका आलिशान इमारतीमधील अनुपम खेर यांचे दोन अपार्टमेंट्स आलिया भट्टने अनुक्रमे ५.१६ कोटी आणि ३.८३ कोटी रुपयांना विकत घेतले होते.